18 ते 23 नोव्हेंबरला ‘ड्राय डे’ घोषित; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांचे आदेश
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया समाप्त होईपर्यंत तसेच 23 नोव्हेंबर रोजी पाचही विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व देशी/विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान व दि. 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त आदेशान्वये, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातील सर्व देशी/विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-1. एफएल-2, एफएल-3. एफएल- 4 (क्लब अनुज्ञप्ती), एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3, सीएल/एफएल/टिओडी-3, टिडी-1 इ.) दि. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वा. पासून, मतदानाचा आदला दिवस दि. 19 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस, मतदानाचा दिवस दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तसेच मतमोजणीचा दिवस दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 263-दापोली, 264-गुहागर, 265-चिपळूण, 266-रत्नागिरी आणि 267-राजापूर या सर्व विधानसभा मतदार संघांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईपर्यंत बंद जिल्ह्यातील सर्व देशी/विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.