| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
दोडामार्ग सीमा तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास कारवाई केली. यावेळी 23 हजार 600 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. अशा गैरप्रकारांवर आळा बसविण्यासाठी येथील नाक्यावर यापुढे आणखी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दोडामार्ग तालुका हा महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांचा सीमेवर वसला आहे. दोडामार्गमधून तिन्ही राज्यांमध्ये अनेकांची दररोज वर्दळ सुरू असते. सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने आचारसंहिता सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दोडामार्ग, आयी, विजघर यांसह सहा सीमा तपासणी नाक्यांवर पोलीस, उत्पादन शुल्क व इतर विभागाचे कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी शुक्रवारी दोडामार्गमध्ये येत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. कृषिकेश रावले यांनी शनिवारी दोडामार्ग चेकपोस्टला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व वाहने थांबवून कसून तपासणी करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. दुपारी एक वाजताच्या सुमारास गोव्यातून आलेल्या जीप व एका कारची तपासणी करताना दोन्ही वाहनांत गोवा बनावटीची बिगर परवाना दारू आढळून आली. त्यानंतर दोन्ही वाहने व संशयितांना पोलीस ठाण्यात आणले. यावेळी 23 हजार 600 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.







