मद्य वाहतुकीचा ट्रक पलटी

। पालघर । प्रतिनिधी ।

मोखाड तालुक्यातील तोरंगण घाट जेवढा निसर्गरम्य मनमोहक आहे, तेवढाच जीवघेणाही आहे. हा घाट रस्ता त्र्यंबकेश्‍वरच्या आंबोलीपासून वालब्रिज पुलापर्यंत तीव्र उताराचा आणि नागमोडी वळणे असलेला आहे. वाहनाचे ब्रेक निकामी होऊन अपघात होण्याचे प्रसंग नेहमी घडत असतात. अशातच शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथून गुजरातच्या दिशेने मद्य घेऊन जाणार्‍या ट्रकचा तोरंगण घाटात अपघात झाला. यात वाहनातील मालाचे आणि वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यातून गुजरातपर्यंत मालवाहतूक वाहनांची मोठी रेलचेल असते. मात्र, घाट रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या वाहनांचे चालक हे नवीन असतात किंवा आंबोलीपासून वाहनचालक गाडीचे ब्रेक लावत येत असतात. यामुळे तोरंगण घाटात पोहचेपर्यंत गाडीचे ऑईल गरम होऊन ब्रेक फेल होतात. यामुळे अपघाताच्या ठिकाणी तीव्र उतार असल्याने गाडीचे ब्रेक लागत नाहीत आणि अपघात घडत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याच पध्दतीने शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथून गुजरातकडे जाणार्‍या गाडीचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने अपघात झाल्यानंतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहनांचे आणि वाहनातील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Exit mobile version