शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या

माजी आ. बाळाराम पाटील यांचे आवाहन
प्रांताधिकारी कार्यालयात पार पडली बैठक


| पनवेल | प्रतिनिधी |
मुंबई आणि उपनगरांमध्ये भविष्यात विजेची चिंता मिटावी म्हणून केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून 100 किलोमीटर ट्रान्समिशन लाईन टाकण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यातील 16 गावांमधून जाणार्‍या लाईनबाबत शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक पार पडली. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. त्यावेळी आधी प्रशासनाने शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे आवाहन केले.

मुंबईनंतर मुंबईला लागून असलेल्या उपनगरांचा झपाट्याने विकास होत आहे. पनवेल तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळासह आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभे राहात आहेत. सिडकोकडून नव्या वसाहती विकसित केल्या जात आहेत. विरार-अलिबाग कॉरिडोर, जेएनपीटी-दिल्ली कॉरिडोर, बुलेट ट्रेन, तळोजा एमआयडीसीचा विस्तार आदी प्रकल्पांचादेखील यात समावेश आहे. या प्रकल्पासाठी आणि वाढत्या नागरीकरणासाठी भविष्यात मुबलक वीजपुरवठा व्हावा म्हणून केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून मुंबई ऊर्जा मार्ग ही ट्रान्समिशन लाईन उभारून दोन हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीज मुंबई आणि परिसरात आणता येईल, अशी यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. कल्याणहून पनवेलमार्गे मुंबई असा मुंबई ऊर्जा प्रकल्पाचा मार्ग आहे. पनवेल तालुक्यातून जाणार्‍या या मार्गांसाठी केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे जमिनीचे भूसंपादन केले जाणार नाही. केवळ टॉवर उभारण्यासाठी जमीन शेतकर्‍याकडून घेतली जाणार असून, शेतकर्‍याला टॉवरखालील जागेला भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. 2022 रोजी नवे वाढीव दर शेतकर्‍यांना दिले जाणार आहेत.

पनवेल तालुक्यातील 16 गावांमधील जमिनीवरून ही लाईन जाणार आहे. ओवे, किरवली, आडिवली, धानसर, तुर्भे, नेवाळी, टेंभोडे, वलवली, कोलवाडी, पालीबुद्रक, हेदुटणे, चिंध्रण, चिंचवली, मोहदर, कांडप आदी 16 गावांमधून ही लाईन घेतली जाणार आहे. यामध्ये नैना, महापालिका आणि या हद्दीच्या बाहेरील गावांना वेगवेगळे दर निश्‍चित करण्यात आले आहे. ही लाईन टाकण्यासंदर्भात शेतकर्‍यांच्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील हेदेखील बैठकील हजर होते. शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पुन्हा शेतकर्‍यांसोबत चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक लावण्याचे या बैठकीत निश्‍चित झाले.

तालुक्यात अनेक प्रकल्पांना इथल्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, तरीही आमचा प्रकल्पाला विरोध नाही; परंतु शेतकर्‍यांचे प्रश्‍न समजून घ्या

. – माजी आ. बाळाराम पाटील


Exit mobile version