कोकणात साहित्य सृष्टी अवतरावी पाहिजे : मधु मंगेश कर्णिक

| महाड | वार्ताहर |

राज्यात साहित्य एक आहे, मराठी भाषा एक आहे आणि कोकण ही साहित्यिकांची बाग आहे; अशा या कोकणात साहित्य सृष्टी अवतरली पाहिजे, अशी अपेक्षा कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. कोकण मराठी परिषदेच्या दहाव्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन किल्ले रायगडच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ समाधीस्थळी पाचाड येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लेखिका भारती मेहता होत्या. प्रारंभी जिजाऊंना अभिवादन करून भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. आमदार भरत गोगावले, प्रमुख विश्‍वस्त रमेश कीर, केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, पाचाडचे सरपंच सीमा बेंदुगडे, कोकण साहित्य भुषण प्रभाकर भुस्कुटे,जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम, रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ यावेळी उपस्थित होते. पाचाड परिसरातील नागरिकांनी देखील साहिय संमेलनाला उपस्थिती लावली. मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्र एक व्हावा हा वारसा साहित्यिकांनी जपला असल्याचे सांगितले. अन्य प्रांतात कोकणच्या साहित्यिकांना स्थान नसल्याने कोकणाची स्वतंत्र कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन करावी लागली, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार भरत गोगावले यांनी कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांच्या मागणीचा संदर्भ देत कोकणात ‘कोमसाप’ची वास्तू उभी करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असेल तर, तो ते नक्कीच ते पूर्ण करतील, असा विश्‍वास व्यक्त केला. सुखद राणे यांनी साठ किल्ल्याची माहिती सांगणार्‍या पुस्तकांचा संदर्भ देत युवा पिढीने या पुस्तकात डोकावले तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची महती कळेल, असे सांगत युवकांनी पुस्तके वाचली पाहिजेत असे आवाहन केले.

नाथ पै, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, साने गुरुजी यांची भाषणे ऐकल्यानेच आपल्याला साहित्याची आवड निर्माण झाली, असे संमेलन अध्यक्षा भारती मेहता यांनी सांगितले. वाचत राहिल्याने साहित्य कसदार बनते असा सल्ला युवा साहित्यिकांना देत कला ही कोणत्याही प्रकारची असली तरी ती अजरामर असते. साहित्यिक हा विज्ञानाची नवी क्षितीजे शोधणारा आणि अन्यायाविरुध्द तुतारी फुंकणारा असावा, असे सांगितले.

नमीता किर, प्रदीप ढवळ, सुधीर शेठ यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. काव्य मनामनातील या कोमसाप महाड शाखेच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे तसेच डॉ. सुभाष कटकदौड यांच्या दोन पेग या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

आगळेवेगळे गौरव चिन्ह
सुरुवातीस कोमसापच्या वतीने मधु मंगेश कर्णिक यांनी आत्तापर्यत लिहिलेल्या 75 पुस्तकांचे नामफलक हातात घेऊन त्यांचा आगळेवेगळे गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या सत्काराने कर्णिक यांना भरून आले.


Exit mobile version