। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
मामाच्या गावची जत्रा आटोपून आईसह घरी परतणार्या एका सात वर्षांच्या चिमुकलीवर काळाने घाला घातला आहे. या चिमुकलीचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झरेबांबर तिठा येथे शुक्रवारी दुपारी घडली आहे.
श्रीया गवस ही आईसोबत झरेबांबरला जत्रोत्सवाला मामाकडे आली होती. या माय-लेकी शुक्रवारी आपल्या गावी परत जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या झरेबांबर तिठा येथे बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी श्रिया ही रस्ता ओलांडून पलीकडे जात असताना दोडामार्ग दिशेने भाजी घेऊन येत असलेल्या एका भरधाव टेम्पोची धडक श्रिया हिला बसली. यावेळी मुलीच्या आईने मोठ्याने टाहो फोडला. तिठ्यावर उभे असलेले प्रवासी व दुकानदारांनीदेखील आरडाओरडा केला. मात्र, श्रिया क्षणार्धातच टेम्पो खाली गेली. चालकाने टेम्पो न थांबविल्याने ती टेम्पोच्या समोरच्या चाकाखाली गेली आणि तिच्या मानेवरून व डोक्यावरून टेम्पोचे पुढील चाक गेले. चालकाने तिला फरफटत नेल्याने ती मागच्या चाकाखाली आली. बस स्टॉपवर उभ्या असलेल्या काहींनी व आसपासचे दुकानदार, ग्रामस्थ आदींनी टेम्पोचालक सुरेश पुंडलिक पवार (20) याला खेचून बाहेर काढले व बेदम चोप देण्यात आला.