कोकण शिक्षक मतदार नोंदणी कार्यक्रमाला शिक्षकांकडून अल्प प्रतिसाद

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I

कोकण शिक्षक मतदार संघासाठी १ ऑक्टोंबर पासून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मात्र या मतदार नोंदणी कार्यक्रमाला शिक्षकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून, २ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४ हजार ४४ शिक्षकांनीच नोंदणी केली आहे. मागील निवडणुकीत १० हजार ७ शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यात आली होती.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्य बाळाराम पाटील यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून कोकण शिक्षक मतदार संघाकरिता शिक्षक मतदारांची १ ऑक्टोंबर पासून ७ नोहेंबरप २०२२ र्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यासाठी २३ ठिकाणे घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिल कार्यालयांचा समावेश आहे. या ठिकाणी जावून नोंदणी करता येणार आहे. मात्र या शिक्षक नोंदणीला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळत आहे.

शिक्षक मतदारसंघाची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादिसंदर्भात दावे व हरकती २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारल्या जाणार असून, २५ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. त्यानंतर ३० डिसेंबर  २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

Exit mobile version