। सोलापूर । प्रतिनिधी ।
मोहोळ तालुक्यातील चिखली येथे बुधवारी (दि. 13) कचऱ्याच्या ढिगार्यात जिवंत पुरुष जातीचे अर्भक आढळून आले. या घटनेमुळे चिखली व परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांसह अन्य नागरिकांनी त्याला तातडीने मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे त्या अर्भकाला जीवदान मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील एका किराणा दुकानाजवळील बोळातील कचऱ्याच्या ढिगार्यात एक पुरुष जातीचे, सुमारे दोन दिवस वयाचे अर्भक होते. दरम्यान दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणाजवळून एक महिला जात असताना तिला रडण्याचा आवाज आला. तिने कचऱ्याच्या ढिगार्याजवळ जाऊन पाहिले तिला एक लहान अर्भक कचऱ्याच्या ढिगार्यात रडताना दिसले. त्याच्या अंगाला पालापाचोळा, बिस्किटाची कागदे लागली होती. त्यावेळी तिने ही माहिती गावातील काही नागरिकांना सांगितली असता सामाजिक कार्यकर्ते मते, पोलीस पाटील व अन्य गावकरी त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी एका खाजगी वाहनातून उपचारासाठी त्या अर्भकाला मोहोळ येथील विहान रुग्णालयात दाखल केले.
डॉ. ज्योती मस्के यांनी त्या अर्भकाची स्वच्छता करून निरीक्षण केले असता त्या बाळाचे हातपाय काळे निळे पडले होते, खरचटल्यामुळे रक्तही येत होते. त्यावर त्यांनी तात्काळ उपचार केले. सध्या बाळाची शारीरिक अवस्था चांगली आहे. या घटनेची फिर्याद गावकामगार पोलीस पाटील विठ्ठल मते यानी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.






