| मुंबई | प्रतिनिधी |
कल्याण पश्चिमेकडील बालाजी डोसा सेंटरमध्ये एका ग्राहकाने खाण्यासाठी घेतलेल्या इडलीमध्ये जिवंत अळी सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संतापलेल्या ग्राहकाने याविषयी दुकानदाराकडे तक्रार केली असता दुकानदाराने ग्राहकाला मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पालिकेने दुकानातील सामान जप्त केले आहे. तर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिम परिसरातील कर्णिक रोडवरील बंगलोर इडली कॅफे येथे ही घटना घडली आहे. तक्रारदार प्रथमेश गोरख शिंदे यांचा मुलगा 12 ऑगस्टला दुपारी 2 च्या सुमारास दुकानातून एक वडा सांबर प्लेट आणि एक इडली प्लेट खरेदी केली होती. ते पार्सल कुटुंबातील सदस्यांना दिलं असता, तक्रारदारांनी स्वतः खाण्यास घेतलेल्या इडली वड्यामध्ये जिवंत अळी त्यांना दिसून आली. याविषयी त्यांनी दुकानदार लिंगराज लिगे गौडा यांच्याकडे जाऊन त्यांना त्याची माहिती दिली. मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी दुकानदाराने ती इडली फेकून दिली. त्यानंतर त्या दुकानदाराने अरेरावीची भाषा वापरली.
यानंतर तक्रारदाराने महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या आरोग्याची खेळ असल्याची तक्रार केली. दाखल तक्रारीनुसार पालिकेने देखील या दुकानावर कारवाई करत दुकानातील सर्व खाद्यसाहित्य जप्त केले. यामुळे संतापलेल्या दुकानदाराने तक्रारदाराला तुला बघून घेतो अशी धमकी दिली. दुकानदाराच्या या भीतीमुळे तक्रारदारांने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घटनेमुळे कल्याण डोंबिवली शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता आणि स्वच्छते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







