पशुपालकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात शेतकरी वर्गाकडे असलेल्या पशुंची गणना करण्यास सुरुवात झाली आहे. या गणनेमध्ये सर्व पशुपालकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.
राज्य शासनाचे पशुसंवर्धन विभागाने राज्यात पशुगणना कार्यक्रम हाती घेतला आहे. या 21 व्या पशुगणना कार्यक्रमाला कर्जत तालुक्यात सुरुवात झालेली आहे. पंचायत समिती कर्जत येथे पशुगणना करण्यासाठी 2024 करीता निवडलेले प्रगणक यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. पंचायत समिती कार्यालय येथे गट विकास अधिकारी पंचायत समिती कर्जत सुशांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रगणक यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण मध्ये पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत डॉ. मिलिंद जाधव तसेच गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी पशुगणनेसाठी निवडलेल्या प्रगणकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर पशुगणना ही कर्जत तालुक्यातील सर्व गावे, गावा अंतर्गत वाडी, वस्ती, पाडे तसेच सर्व शहरी वॉर्ड मध्ये एकूण 20 प्रगणक यांच्यामार्फत होणार आहे. तसेच यावेळी पशुगणना ही अँड्रॉइड मोबाइल अॅपद्वारे, प्रगणक यांच्याद्वारे घरोघरी जाऊन होणार आहे. त्यात प्रगणक हे पशुधन जसे गायी, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या, हत्ती, घोडे, वराह, कुक्कुट पक्षी यांची नोंद ठेवणार आहेत. त्याचवेळी इतर पशू यांच्या प्रजाती, जात, लिंग, संख्या आणि उपयोगानुसार संबंधित माहिती ही संकलित करून मोबाइल अॅपमध्ये भरणार आहेत. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी , डॉ. शामराव कदम व सहा. आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीश बारडकर यांच्या मार्गदर्शाखाली कर्जत तालुक्यात पशुगणना होत आहे. 21 वी पशुगणना ही दिनांक 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार आहे.
शेतकरी पशुपालकांच्या घरोघरी, गोठ्यात, हाऊसिंग सोसायटी येथे भेट देणार्या प्रगणकांना पशुगणना संबंधित सर्व आवश्यक माहिती द्यावी आणि प्रगणक यांना सहकार्य करावे.
सुशांत पाटील,
गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती






