| खारेपाट | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील आवास येथे ग्रुप ग्रामपंचायत आवास ग्रामस्थांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय पशु मेळाव्याचे आयोजन रविवार, दि. 11 जानेवारी रोजी करण्यात आले होते. त्याला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्याचे उद्घाटन आवास सरपंच अभिलाषा राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत राणे, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी जयेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, आवास ग्रामस्थ, अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवर, पशु मालक व पशुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात विविध जातीचे बैल, घोडे, गायी, म्हशी तसेच मोठे बोकड अशा प्रकारच्या प्राण्यांचा शेकडोंच्या संख्येने समावेश होता. या मेळाव्यात पशुवैद्य रवींद्र पाटील, अनुज पाटील व त्यांचे सहकारी यांनी परीक्षण करून प्रदर्शनातील पशुंचे गुणांकन केले व पशुमालकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. अशा अशाप्रकारे आवास ग्रामपंचायत ग्रामस्थांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पशु मालकांनी त्यांचे आभार मानले.