वाढत्या उन्हाच्या कचाट्यात पशुधन

| पाली/गोमाशी| वार्ताहर|

उन्हाच्या काहीलेने माणसांबरोबरच पशुपक्षी व जनावरांची देखील वाताहत झाली आहे, अशा परिस्थितीत शेतकरी व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे आणि या संदर्भात मार्गदर्शक उपाययोजना व सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड डॉ. सचिन देशपांडे यांनी दिली.

उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे शक्यतो थंड वातावरणात त्यांना चारा टाकावा. म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथींच्या कमी संख्येमुळे उष्णतेचा त्रास त्यांना गाईपेक्षा जास्त होतो. त्यामुळे त्यांची अधिकची काळजी घ्यावी. योग्य पशुआहार, मुरघासचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आवश्यक दुग्ध उत्पादन मिळवणे शक्य आहे. जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषध पाजावे, जनावरांचे नियमितपणे लाळ्या खुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इत्यादी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. पशुखाद्यामध्ये मिठाचा वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे.

तसेच दुधाळ पशूंना संतुलित पशुआहार यासोबत खनिज मिश्रणे द्यावेत. चाऱ्यामध्ये एकदम बदल करणे टाळावे. पक्ष्यांच्या घरट्यामध्ये तापमान नियंत्रक व्यवस्था असावी. मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ती जागा पाण्याच्या तलावापासून, सार्वजनिक ठिकाणापासून दूर व संरक्षित असावी आणि तेथे या संबंधीच्या आवश्यक माहितीचा फलक असावा. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

उष्माघाताने जनावरांवर होणारे परिणाम
  1. भरपूर पाणी पिण्याकडे कल
  2. कोरडा चारा न खाणे
  3. हालचाली मंदावणे
  4. सावलीकडे स्थिरावणे
  5. शरीराचे तापमानात वाढ
  6. जोरात श्वास घेणे
  7. भरपूर घाम येणे
  8. उत्पादनात कमी येणे
  9. प्रजनन क्षमता कमी होणे
  10. रोगप्रतिकार शक्ती कमी
या उपाययोजना आवश्यक
जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चरण्यास सोडावे. हवामानपुरक सुधारित गोठे बांधावेत, गोठ्याची ऊंची जास्त असावी जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील. छप्पराला शक्यतो पांढरा चुना लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा, पाचट टाकावे. ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल.
बैलांना मशागतीसाठी उन्हात काम नको
बैलांकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. यावेळी त्यांना पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये मिठाचा वापर करावा.

उष्माघातापासून होणारे पशुधानाचे नुकसान टाळण्यासाठी रायगड पशुसंवर्धन विभाग सज्ज आहे. पशुसंवर्धन विभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, कृपया त्याची पशुपालकांनी अंमलबजावणी करावी, जेणेकरून उष्माघात टाळता येईल. तरीसुद्धा जिल्ह्यात कोणतीही अशी बाब आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी1/श्रेणी 2 यांना संपर्क करून बाधित जनावरांवर उपचार करून घ्यावेत.

डॉ. सचिन देशपांडे
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड, अलिबाग
Exit mobile version