इमारतींमधील रहिवास धोकादायक

28 इमारती खाली करण्याची पालिकेची नोटीस

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

पालिका हद्दीतील राहण्यासाठी अतिधोकादायक अशा 28 इमारतींची यादी पालिका प्रशासनाने आपल्या संकेत स्थळावर जाहीर केली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ब मध्ये सर्वाधिक 16 इमारती असून, काही रहिवाशी संस्थांमधील सर्वच इमारती सरसकट अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या इमारतीत राहणार्‍या नागरिकांनी इमारती खाली करून धोकादायक ठरवण्यात आलेल्या या इमारती पाडून टाकाव्यात, असा इशारा देण्यात आल्याने इमारतींमधील रहिवासी धास्तावले आहेत.

पनवेल पालिका हद्दीत अनेक ठिकाणी 30 ते 35 वर्षे इमारती आहेत. हजारो सदनिका असणार्‍या या इमारतीमध्ये लाखो रहिवासी वास्तव्यास आहेत. पालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी पालिका हद्दीतील रहिवासी संस्थांनी आपापल्या संस्थांमधील इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पालिकेकडे सादर करण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले होते. पालिकेच्या या आदेशानुसार अनेक रहिवासी संस्थांनी खासगी संस्थेची नेमणूक करून आपापल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचे रिपोर्ट पालिकेकडे सोपवले आहेत. मात्र, त्यानंतरसुद्धा काही रहिवासी संस्थानी आपल्या रहिवासी संस्थांमधील इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट पालिकेकडे सादर न केल्याने पालिकेतर्फे नेमण्यात आलेल्या संस्थेने अशा रहिवाशी संस्थांमधील इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्यानुसार तसेच इतर रहिवासी संस्थांनी नेमलेल्या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार राहण्यासाठी धोकादायक असलेल्या इमारतीची यादी पालिकेने जाहीर केली असून, या इमारती खाली करण्याची सूचना पालिकेकडून रहिवाशांना करण्यात आली आहे. अतिधोकादायक इमारती फार जुन्या असून, त्या केव्हाही पडण्याचा धोका आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, याबाबत पालिकेने संबंधित इमारतींमधील रहिवाशांना सतर्क केले असून, त्या लवकरात लवकर खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पालिकेने नेमलेल्या संस्थेच्या अहवालावर हरकत असल्यास संबंधित रहिवासी संस्थेने आपली हरकत पालिका प्रशासनाकडे नोंदवून खासगी संस्थेची नेमणूक करून पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येणारा अहवाल पालिकेकडे सादर करावा.

सदाशिव कवठे, प्रभाग अधिकारी, प्रभाग क्रमांक ब

Exit mobile version