कोळी बांधवांचा आक्रोश; ‘भैय्या हटाव, एलईडी हटाव’चा नारा

भरसमुद्रात परप्रांतियांकडून स्थानिक मासेमारांवर हल्ला

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

खोल समुद्रात बेकायेदशीररित्या एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध शासनाने ताबडतोब कारवाई करून ती बंद करावी. एलईडी मासेमारी करणाऱ्या परप्रांतियांची अरेरावी वाढत असून, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. नुकतीच मुरुड समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या कोळी बांधवांना परप्रांतीय मासेमारांनी नाखवा व खलाशांना मारहाण करुन बोटीतील डिझेल व मासेमारी साहित्य लंपास केले. याविरोधात कोळी बांधव आक्रमक झाले असून, ‌‘भैय्या हटाव, एलईडी हटाव’चा नारा देत आमच्या कुंकवाचं रक्षण करा, आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोटेश्वरी मंदिरात आयोजित बैठकीदरम्यान दिला. यावेळी शेकडो कोळी बांधव उपस्थित होते.

मुरुड एकदरा येथील कस्तुरी आयएनडी-एमएच/3-एमएम-2683 या बोटीतील नाखवा व खलाशी खोल समुद्रात मासेमारीकरिता गेले असता त्याच ठिकाणी एलईडी मासेमारी करणाऱ्या परप्रांतियांकडून कस्तुरी नौकेमधील नाखवा व खलाशांना मारहाण करण्यात आली. ही बातमी मिळताच मुरुड शहरासह पंचक्रोशितील पाच सोसायट्यांचे कोळी बांधव व महिलांनी शेकडोंच्या संख्येने कोटेश्वरी मंदिराजवळ येऊन एलईडी हटाव व आरोपींना तात्काळ अटक करा, असा नारा देण्यात आला. यावेळी महालक्ष्मी मच्छिमार सोसायटी राजपुरीचे चेअरमन विजय गिदी, हनुमान मच्छिमार सोसायटी एकदराचे चेअरमन पांडुरंग आगरकर, माहेश्वरी विविध कार्यकारी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित चेअरमन जगन वाघरे, जय भवानी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन प्रकाश सरपाटील आदींसह शेकडो महिला व कोळी बांधव उपस्थित होते.

सविस्तर वृत्त असे आहे की, माहेश्वरी विविध कार्यकारी मच्छिमार सहकारी संस्थेची यंत्रचलित नौका कस्तुरीचे बोट मालक धुर्वा गोपाळ लोदी, खलाशी सुरेश पांडुरंग आगरकर व त्यांचे सहकारी असे 12 जण खोल समुद्रात मासेमारी करत होते. यावेळी अलिबाग मधील साखर-आक्षी येथील खंडोबा प्रसन्न व नवदुर्गा अशा आठ नौका बेकायदेशीररित्या एलईडी लावून मासेमारी करत होते. नौकांमध्ये असणाऱ्या परप्रांतियांनी आपल्या आठ नौकांना जवळ करुन कस्तुरी नौकेमध्ये घुसून चोरी व जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने नौकांची नासधूस केली. तसेच 14 जणांना मारहाण करून बोटीतील डिझेल व मासेमारीचे सामान घेऊन पलायन केले. कस्तुरी बोट मालक धुर्वा लोदी व सुरेश आगरकर यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याने बोटीमधील खलाशांनी बोट समुद्रालगत आणून दोघांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ही बातमी कळताच कोळी बांधव व महिलांनी शेकडोंच्या संख्येने मुरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली; परंतु जमावबंदी असल्याने कोटेश्वरी मंदिराजवळ येऊन एलईडी हटाव, भैया हटाव यांचे फलक दाखवून संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटक करा, आमच्या कुंकवाचं रक्षण करा, नाहीतर सर्वात मोठे आंदोलन करु, अशी मागणी महिला कोळी बांधवांनी केली. याचं गांभीर्य लक्षात घेऊन मुरुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी घटनास्थळी येऊन आपली तक्रार घेतली असून, कायदेशीर कारवाई करु, असे आश्वासन दिले. यावेळी मुरुड पोलीस ठाण्यात मच्छिमार सोसायटीच्या शिष्टमंडळाने संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

जो प्रकार घडला, तो निंदनीय आहे. आरोपींना अटक झालीच पाहिजे नाहीतर आम्ही मोठे आंदोलन करु. आमचे गरीब कोळी बांधव शासनाच्या नियमानुसार मासेमारी करतात. परंतु, बेकायदेशीरपणे एलईडी लावून जे मासेमारी करतात, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. शासन आपल्या दारी की एलईडीच्या दारी, असा प्रश्न पडला आहे. तरी, कोळी बांधवांना न्याय द्यावा.

पांडुरंग आगरकर, चेअरमन,
हनुमान मच्छिमार सोसायटी एकदरा

एलईडी मासेमारी जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत कोळी बांधव स्वस्त बसणार नाही. मराठा आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन करु.

जयवंत आबांजी, कोळी बांधव

मुरुड पंचक्रोशितील कोळी बांधव गरीब आहेत. एलईडी मासेमारीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. परप्रांतियांची मुजोरी एवढी वाढली आहे की, आमच्या बांधवांवर प्राणघातक हल्ला केला. अशा परप्रांतियांना तात्काळ अटक करुन योग्य ती शिक्षा द्यावी.

विजय गिदी, चेअरमन,
महालक्ष्मी मच्छिमार सोसायटी, राजपुरी

कोळी बांधवांनी शांतता राखावी, आपली तक्रार घेतली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करु.

निशा जाधव, पोलीस निरीक्षक, मुरुड
Exit mobile version