मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या कार्यपद्धतीमुळे स्थानिकांमध्ये समाधान

| माथेरान | वार्ताहर |

नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे (शिंदे) यांच्या खांद्यावर आलेली असतानासुध्दा त्यांनी अधिक जोमाने आणि इच्छा शक्तीच्या बळावर नागरिकांना भेडसावत असणार्‍या सर्व अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी युद्धपातळीवर अनेक कामे तडीस नेल्यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे शासनाने त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि या पदाला त्यांनी आपल्या कार्यपद्धतीमुळे उत्तम प्रकारे न्याय दिलेला आहे. अल्पावधीतच त्यांनी इथल्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन गावातील गल्लीबोळातीलसुद्धा लहान सहान कामे असोत ती पूर्ण केलेली आहेत. नागरिकांना भेडसावत असणार्‍या समस्या दूर करण्यासाठी पावसाळ्यात आपत्कालीन वेळेस त्यांनी आपत्ती व्यवस्थापन हा सोशल मीडियावर ग्रुप तयार करून त्यावर नागरिकांना ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या आपल्या कर्मचारी, अधिकारी वर्गाच्या सोबतीने जलदगतीने मार्गी लावल्या आहेत.

अतिवृष्टी काळात एक महिला अधिकारी असताना त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे. सर्वांशीच मिळतेजुळते घेऊन लोकांना अभिप्रेत असणारी कामे पूर्णत्वास नेली आहेत, त्यामुळे निदान आगामी निवडणुका पूर्ण होईपर्यंत अशा कार्यक्षम प्रशासकांची या दुर्गम पर्यटनस्थळ असणार्‍या माथेरानला खर्‍या अर्थाने गरज आहे. त्यांची कामगिरी आणि कार्यपद्धती उल्लेखनीय असल्याचे स्थानिकांचे मत आहे त्यामुळेच त्यांनी त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ याच ठिकाणी पूर्ण करावा जेणेकरून नागरिकांना वेळोवेळी उद्भवणार्‍या समस्या वेळीच तडीस जाऊ शकतात, असे ज्येष्ठ नागरिकांमधून तसेच महिला वर्गामधून सुध्दा बोलले जात आहे.

प्रशासक म्हणून भणगे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाची छाप सोडली आहे. येणार्‍या प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा कल असतो.

भास्कर शिंदे, उद्योजक माथेरान

माथेरान शहराला एक चांगल्या मुख्याधिाकारी लाभलेल्या आहेत. सध्याचे राजकारण पाहता असं वाटतं की, ह्याच निदान तीन वर्षे मुख्याधिकारी राहिल्या पाहिजेत. जेणेकरून या गावाचा विकास लवकर होईल आणि न बोलता लोकांची कामे होतील.

राकेश कोकळे, अध्यक्ष, धनगर समाज माथेरान

Exit mobile version