स्थानिकांची दिघी पोर्टला धडक; नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी

आगरी संघटनेकडून व्यस्स्थापनाला निवेदन

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढणार्‍या 18 गाव आगरी युवा संघटनेने दिघी पोर्टवर धडक देत निवेदन दिले. स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य न दिल्यास द्या, हजारो युवकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून व्यवस्थापनाला देण्यात आला आहे.

दिघी पोर्ट या अदानी प्रकल्पामधील विविध कंपन्यांमध्ये शासनाच्या नियमानुसार ऐंशी टक्के नोकर्‍या ह्या स्थानिक भूमीपुत्रांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ही प्रमुख मागणी घेत संघटनेने शुक्रवारी दिघी पोर्ट अदानी कंपनीच्या व्यवस्थापक अधिकार्‍यांना भेट घेत निवेदन दिले. बहुतांशी आगरी तसेच स्थानिक युवकांना नोकरीसाठी मुंबईमध्ये तसेच जिल्ह्याबाहेर जावे लागत आहे. परंतु, आपल्या भागातील दिघी पोर्ट अदानी कंपनीमध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे होणार्‍या या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पहिले पाऊल म्हणून निवेदन दिले. यापुढे दिघी पोर्ट कंपनी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर उपलब्ध होणारी रोजगाराची संधी ही स्थानिक युवकांनाच देण्यात येईल, असे आश्‍वासन दिघी पोर्ट व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे. मात्र, असे न झाल्यास भविष्यात भूमीपुत्रांच्या हक्कासाठी हजारो युवकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यवस्थापक कमिटीला अठरा गाव आगरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी सुभाष चौलकर, आदेश धुमाळ, हरीश पयेर, सुहास पाटील, गिरीश पाटील, निशित गायकर, हेमंत नाक्ती, उदेश म्हात्रे, अक्षय चाळके, मयूर बिराडी, सूजित पयेर, नामदेव शितकर, जयेश पयेर, दिनेश पयेर, नितीन कांबळे, किरण पाटील, रघुनाथ भायदे, मनोहर पाटील, विवेक भायदे, अजिंक्य भायदे, विशाल भायदे व इतर बहुसंख्य युवक उपस्थित होते.

Exit mobile version