भंगारवाद नडला! स्थानिकांनी दिले खासदार, आमदाराच्या पुत्रांविरोधात निवेदन


। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

माणगाव येथील पॉस्को भंगारवाद आता अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचला आहे. खासदार आणि आमदार पिता-पुत्राविरोधात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना स्थानिकांनी निवेदन देत दादागिरी व गुंडगिरी विरोधात कारवाई करून कंपनी परिसरात स्पेशल पोलिस चौकी उभारण्याची मागणी केली आहे.

माणगांव तालुका वहातुक सेना अध्यक्ष ज्ञानेश्‍वर रमेश उतेकर यांनी ही मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास 12 जुलैपासून माणगाव पोलीस ठाण्यासमोर 100 ग्रामस्थांसोबत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या संदर्भात दिलेल्या निवेदनानूसार विळे भागाड एमआयडीसीमध्ये 30 वर्षापुर्वी अत्यंत अल्प मोबदल्यात जागा संपादित झाल्या आहेत. पॉस्को कंपनी ही या परिसरातील मोठी कंपनी आहे. सुरवातीपासून कंपनीमध्ये बाहेरच्या लोकांनी राजकीय दबावापोटी ताबा घेतला असून स्थानिक लोकांवर सतत अन्याय होत आहे.

स्कॅप, लॉजीस्टीक व स्थानिक एसपी. लॉजीस्टीक कंपनीचा ट्रान्सपोर्ट हा मुख्य उदयोग आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्क्रॅपची बिडींग ऑनलाईन होत आहे. पुर्वी ठराविक लोक घेत होती;मात्र कंपनीने बिडींग ऑनलाईन केल्याचा राग आल्यानेइतर कोणीही बिडिंग करून नये व इतर कोणी बिडिंग केली तर त्यांच्या गाड्या फोडणे, गाडयाजाळणे गाड्यांच्या टायरची हवा काढणे व चालकांना मारझोड करून जिवे ठार मारण्याची धमकी आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले व खासदार सुनिल तटकरे यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे व बाबू खानविलकर हे बेकादेशीर जमाव जमवून विळा एमआयडीसी व कोलाड, सुतारवाडी परिसरात करत आहेत.


त्यांच्याबाबत तक्रार करुनही कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झाली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून या परिसरामध्ये दहशत निर्माण झाली आहे. भविष्यात कंपनी बंद झाली तर स्थानिक लोकांवर उपासमारीची वेळ येईल व छोटे-मोठे धंदे बंद पडतील. म्हणून या परिसरातील दादागिरी व गुंडगिरी बंद झाली पाहिजे व चुकीच्या लोकांवर कायदेशी कारवाई करून या परिसरामध्ये स्पेशल पोलीस चौकी उभारून संरक्षण मिळावे व तसे न मिळाल्यास 12 जुलैपासून माणगांव पोलीस ठाण्यासमोर स्थानिक संरपंच व किमान 100 ग्रामस्थ मिळून सकाळी 11 वाजल्यापासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Exit mobile version