एनडीझेड झोन उठविण्याची मागणी
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील कोळवाडी व पाले बुद्रुक परिसरात होणार्या एअरफोर्स प्रकल्पाला स्थानिक शेतकर्यांनी विरोध दर्शविला आहे. एनडीझेड झोन उठवा त्यानंतरच हा प्रकल्प मार्गी लावा अशी भूमिका स्थानिक प्रकल्पग्रस्तांसह सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली आहे. याबाबत नुकतीच सर्वपक्षीय बैठक पार पडली.त्या बैठकीत या प्रकल्पाला सर्वानुमते विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोळवाडी व पाले बुद्रुक परिसरातील 180 एकर जमीन एअर फोर्स प्रकल्पासाठी संपादन करण्याबाबत पनवेलच्या उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी बैठक बोलावली होती. या बोलाविलेल्या बैठकीला आ.प्रशांत ठाकूर, आ.बाळाराम पाटील, आर.सी.घरत, शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील, माजी पं.स. सदस्य काशिनाथ पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे आमोद ठक्कर, हेमराज म्हात्रे, संरक्षण खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी सर्वांनी या भूसंपादनाला विरोध दर्शविला. 180 एकर जागेत उभ्या राहणार्या या प्रकल्पामुळे या परिसरातील 900 चौरस मीटर परिघात ग्रामस्थांच्या बांधकामांवर बंधन येणार आहेत. तीन मीटरपेक्षा उंच बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. ते पाहता देशासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असला, तरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना याचे दूरगामी परिणाम भोगावे लागणार असल्याने स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.