मागण्यापूर्ण होईपर्यंत लढा चालूच ठेवणार असल्याचा इशारा
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील उसर येथे गेल कंपनीचा दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. स्थानिकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी, यासाठी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी (दि25) कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढविण्यात आला. या आंदोलनात प्रकल्पग्रस्त, स्थानिक व महिलांनी एकत्र येत गेल कंपनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.

प्रकल्पग्रस्तांना गेल कंपनीत कायम नोकरी मिळावी अशा अनेक मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त व स्थानिकांनी कंपनी प्रशासनाकडे निवेदने दिली. जिल्हा प्रशासनाकडे देखील निवेदन देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही. स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याने निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली उसर, घोटवडे, नाईक कुणे, मल्याण, कंटक कुणे, आदी गावांतील प्रकल्पग्रस्त स्थानिकांनी सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जमाव केला. हातात करवंटी घेत आंदोलनकर्त्यांनी कंपनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. यावेळी उसर येथील गेल कंपनीसमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. सात अधिकारी, 63 अंमलदार एक आरसीपी प्लाटून व दोन वाहतूक पोलीस यांचा समावेश होता. या परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. या आंदोलनानंतर गुरुवारी ( दि.26 ) कंपनीच्या प्रवेश द्वारासमोर न्याय मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल प्रकल्पासाठी उसरसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या. कवडीमोल भावाने शेतकऱ्यांकडून जमीन घेतल्या. मात्र, स्थानिक व प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा प्रशासनासह कंपनी प्रशासनाकडे निवेदन देऊन मागण्या पुर्ण करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, प्रशासन व कंपनी प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलनाची भुमिका घेतली आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे.
निलेश गायकर
आंदोलनकर्ते






