मंडळ अधिकारी कार्यालयाला कुलूप?

ग्रामस्थ अर्ज घेऊन येतात; पण स्वीकारणार कोण?
अंग्रेनगरमधील घरांत पाणी शिरूनही पाहणी नाही

| अलिबाग | प्रतिनिधी |

रेवदंडा बायपास रस्त्यालगत असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून मंडळ अधिकारी उपस्थित नसल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार समोर आली आहे.

रेवदंडा परिसरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे अंग्रेनगर भागातील काही ग्रामस्थांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. या घटनेमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, संबंधित परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी घटनास्थळी आले नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
आपल्या अडचणी मांडण्यासाठी तसेच मदतीसंदर्भात संपर्क साधण्यासाठी ग्रामस्थांनी मंडळ अधिकाऱ्यांना दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, विविध दाखले, महसूलविषयक कामे तसेच अर्ज सादर करण्यासाठी ग्रामस्थ आजही मंडळ अधिकारी कार्यालयात येत आहेत. मात्र कार्यालयात अर्ज स्वीकारण्यासाठीही कोणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अर्ज घेऊन माघारी परतावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेले असताना संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र, अधिकारी कार्यालयातही उपलब्ध नाहीत आणि दूरध्वनीवरही संपर्क होत नसल्याने नागरिकांनी आपल्या समस्या नेमक्या कोणाकडे मांडायच्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महसूल प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मंडळ अधिकारी कार्यालयात नियमित अधिकारी अथवा पर्यायी कर्मचाऱ्याची व्यवस्था करावी, ग्रामस्थांचे अर्ज स्वीकारावेत आणि अंग्रेनगर परिसरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कार्यालयात अधिकारी नाहीत… अर्ज स्वीकारायला कर्मचारी नाही… फोनही बंद; मग ग्रामस्थांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे?

दरम्यान, याबाबत आता नवीन माहिती समोर आली असून, संबंधित मंडळ अधिकारी आजारी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या कामासाठी गेल्या तीन दिवसांपासून रेवदंडा येथील मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारल्या. कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, अधिकारी आजारी असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

यावेळी संबंधित ज्येष्ठ नागरिकाने, “आपण आजारी असल्यामुळे कार्यालयात येऊ शकत नसाल, तर किमान कार्यालयाबाहेर तसा सूचना फलक लावणे आवश्यक होते. त्यामुळे कामासाठी दूरवरून येणाऱ्या नागरिकांना कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागल्या नसत्या,” अशी नाराजी प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केली. मंडळ अधिकारी कार्यालयाबाहेर कोणतीही पूर्वसूचना अथवा माहिती देणारा फलक नसल्याने या ज्येष्ठ नागरिकाला सलग तीन दिवस कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. त्यामुळे त्यांची नाहक धावपळ आणि मोठी गैरसोय झाल्याची बाब समोर आली आहे.

Exit mobile version