जालना | प्रतिनिधी |
मजोपर्यंत ऑक्सिजनची गरज वाढत नाही किंवा रुग्णालयांमध्ये दाखल होणार्या रुग्णांची संख्या वाढत नाही तोपर्यंत आज लावलेल्या निर्बंधांपेक्षा आणखी निर्बंध वाढवण्याची गरज वाटत नाही,असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पाश्वर्र्भूमीवर रविवार मध्यरात्रीपासून पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आता यानंतर राज्यातील निर्बंध वाढणार का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
रुग्णांमध्ये वाढ होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी साधी लक्षणे असली तर घरीच उपचार घ्यावे. यासोबतच मास्कचा वापर करा. एवढेच नाही तर गरम पाणी आणि व्यायामही करा.फ
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्याच्य हितासाठी निर्बंध पाळणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्याचे आणि लसीकरण करून घेण्याचे आवाहन राजेश टोपेंनी केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या 2 ते 3 दिवसांमध्ये दुप्पट होती. काल पर्यंत 40 ते 45 हजार रुग्णांची वाढ होत असल्याने असे निर्बंध लावणे आवश्यक होते असेही टोपे म्हणाले.
ब्युटीपार्लर,जीम सुरु राहणार
10 जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. जीमदेखील क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, व्यायाम करताना मास्क वापरणे आवश्यक असणार आहे. तसेच व्यायामशाळेत केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.
एकाच दिवशी दीड लाख कोरोनाबाधित
भारतातील रविवारी नवीन कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे गेला. एका दिवसात सापडलेल्या करोना बाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी 1,59,632 नवीन करोना रुग्ण आढळले. तर 40,863 रुग्णही बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत करोनामुळे 327 मृत्यू झाले आहेत. दैनिक पॉझिटिव्हीटी रेट 10.21 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3,44,53,603 आहे.
मुंबईतील दोन पोलीस दगावले
गेल्या 48 तासांत क रोनाग्रस्त दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. करोनाची बाधा झालेल्या 57 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक आर.आर. रेडकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तसेच मोटर परिवहन विभागात कार्यरत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र भाटी यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 125 वर पोहोचली आहे.