कुसगावकरांची मंत्रालयाकडे कूच; प्रशासनाकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
वाई तालुक्यातील कुसगाव येथील बफर झोनमध्ये सुरु असलेला ब्लॅक जेम्स स्टोन क्रशर बंद करा, यासाठी दि. 17 जुलैपासून ग्रामस्थांचा संपूर्ण कुटुंब आणि गायी गुरांना घेऊन कुसगाव, एकसर, व्याहळी ते मंत्रालय लाँग मार्च सुरु आहे. आज त्यांचा मुक्काम नवी मुंबईतील नेरूळ या ठिकाणी असताना कृषीवलच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.
यावेळी त्यांनी सांगितले की, या क्रशरमुळे निसर्गाचा ऱ्हास पाण्याचे प्रदूषण, आजारपण आणि गावकऱ्यांची आयुष्य धोक्यात आले आहे. याबाबत आम्ही वाईच्या तहसीलदारांबरोबर चर्चा केली; परंतु त्यांनी आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. जर आम्हाला तिथे न्याय मिळत नसेल, तर तो न्याय मागण्यासाठी आम्ही शांततेत लोकशाही मार्गाने आमचा लढा देत आहोत.
पुढे त्यांनी सांगितले की, हा मार्ग वाई, सुरू, खंडाळा, शिरवळ, पुणे, तळेगाव, लोणावळा, खोपोली, चौक, पनवेल, खारघर, नेरूळ, चेंबूर मंत्रालय असा असेल. यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, स्थानिक आमदार व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी अजून आमच्या लाँग मार्चला भेट दिली नाही. लाँग मार्च सुरू असताना ते आमच्या बाजूने मंत्रालयात गेले, पण आम्हाला भेट देण्यासाठी थांबले नाहीत, याचा आम्ही निषेध करत आहोत. या लाँग मार्चमध्ये कोंडाबाई शिंदे नावाची महिला उष्माघाताने पुण्याजवळ बेशुद्ध झाली. तिला दवाखान्यात भरती करण्यात आले आणि आता ती परत या मोर्चात सहभागी झाली. खोपोलीजवळ मोर्चा आल्यानंतर खोपोली ग्रामीण रुग्णालयात 12 महिलांना थकवा, अशक्तपणा याबाबत उपचार करण्यात आले. हे सर्व सहन करून इथे त्या पुन्हा मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा हा शांततेत आणि लोकशाही मार्गाने चालूच राहणार, असा निर्धार सर्वांनी केला आहे.






