| पाली/गोमाशी | प्रतिनिधी ।
नवीन वर्षातील पहिल्या दिवशी अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गुरुवारी (दि.1) भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने भाविक पालीत दाखल झाले होते.
संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. सध्या नाताळची सुट्टी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पालीत भाविक व पर्यटक आले होते. भाविकांची मोठी गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिक यांचा धंदा देखील तेजीत होता. परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजली होती. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले यांची दुकाने सजली होती. आदिवासी महिला कंदमुळे घेऊन विक्रीसाठी बसल्या होत्या. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून खरेदी करत होते. त्यामुळे धंदा चांगला झाला. मात्र, पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते.
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद (भोजन) उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखील उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
-जितेंद्र गद्रे, अध्यक्ष,
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
वर्षातील पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. भाविकांची खूप गर्दी असल्याने व्यवसाय देखील चांगला झाला. आलेल्या भाविकांनी मनोभावे बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.
-राहुल मराठे,
व्यावसायिक
