महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

| चिपळूण । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बहादूरशेख नाका येथे दररोज संध्याकाळी वाहतूककोंडीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. येथे तब्बल एक ते दीड तास वाहनचालकांना अडकावे लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडत आहे. हा त्रास दररोजचा झाला आहे.

बहादूरशेख नाका येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. नाक्यासह दोन्ही बाजूने पिलर उभे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. संध्याकाळी या मार्गावर वाहनांची गर्दी जास्त होते तसेच खेड, पोफळी, पंधरागावकडे जाणारे प्रवासी वाहनाच्या प्रतिक्षेत नाक्यावर उभे असतात. मुंबईकडे जाणारे प्रवासीही बहादूरशेख नाक्यावर उभे असतात. आधीच अरुंद झालेल्या या रस्त्यावर एखादी एसटी किंवा खासगी वाहतूक करणारी बस थांबली तर मागून येणारे वाहन ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करते.

त्याचवेळी समोरून वाहन आले तर दोन्ही बाजूच्या वाहनांना जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. परिणामी, वाहने अडकतात आणि वाहतूक कोंडी होते. सायंकाळी साडेपाचनंतर रात्री नऊपर्यंत हा त्रास नेहमी सुरू असतो. एकदा वाहतूककोंडी झाली तर तब्बल एक ते दीड तास वाहने अडकून पडतात. दुचाकीस्वार वगळता कोणतीही वाहने पुढे जात नाहीत. चिपळूण बसस्थानकातून येणारी एसटी वाहतूक कोंडीत अडकते. एसटीतील प्रवाशांना सायंकाळी लवकर घरी जायची घाई असते. वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर ते वाहतूक कोंडी करणार्‍यांना शिव्या देत बसतात. मोठे कंटेनर आणि खासगी वाहनेही या कोंडीमध्ये अडकतात. मुंबईकडे जाणार्‍या खासगी वाहनचालकांना अनेकवेळा वाहन चालवण्याची शिस्त नसते. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ते पुढे जाण्याची घाई करत असतात. त्यात पुन्हा वाहने अडकण्याचा प्रकार घडतो.

पोलिस कर्मचार्‍यांना मनस्पात
वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी चिपळूण पोलिस ठाण्यातील चार कर्मचारी बहादूरशेख नाक्यावर तैनात असतात; मात्र त्यांनाही वाहतूक आटोक्यात येत नाही. पोलिस कर्मचार्‍यांनी शिटी मारून किंवा हात दाखवून वाहन थांबवण्याची सूचना केली तरी पोलिसांकडे दुर्लक्ष करत अनेक वाहनचालक पुढे जाण्याची घाई करतात आणि त्यामुळे वाहतूककोंडी होते. अशावेळी पोलिसांना मनस्ताप होतो.

Exit mobile version