पोपटी खवय्यांची होणार निराशा
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
बदलत्या हवामानामुळे आणि अवेळी पावसाने जमीन ओली असल्याने शेतकर्यांनी अद्याप वालाची शेती केलेली नाही. तर काही भागात वालाची लागवड झाली असली तरी अवेळी पावसाने ही लागवड पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकर्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. त्यामुळे पोपटीसाठी लागणारा वाल हा उशिरा पिकणार असल्याने पोपटीची चव ही थंडी ऐवजी उन्हाळ्यात चाखावी लागणार आहे.
रायगडात भात शेती आटोपल्यावर गावठी वाल पिकवला जातो. नोव्हेंबर पासून वाल पिकाची पेरणी केली जाते. मुरूड तालुक्यातील बरीच गावे समुद्रकिनार्यावर असून येथील खारवण जमिनीवर केलेला वाल स्वादिष्ट आणि वर्षभर टिकणारा असतो. त्यामुळे त्याला मुंबई-पुण्यातून भरपूर मागणी असते. पोपटीसाठी देखील या वालाच्या शेंगा चविष्ट असतात.
मुरूड तालुक्यातील वाणदे, शिघ्रे, खारआंबोली, नागशेत गावातील शेत जमिनीत ऑक्टोबर महिन्यात पेरलेले वाल अवकाळी पावसाने कुजले आहेत. येथील शेतकरी गोपाळ वारगे, यांनी सांगितले की, यावेळी वालाने शेती बहरून हिरवाई दिसू लागते. होळी सणाच्या दरम्यान भरलेल्या वालाच्या शेंगा मार्केट मध्ये येऊ लागतात. परंतु यंदा अवकाळीमुळे जमिनीत पाणी असल्याने वालाची पेरणी देखील करता येत नाही. ज्यांनी यापूर्वीच पेरणी केली त्यांचे बियाणे कुजून गेले असून पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. म्हणजे जानेवारीत जरी पेरणी केली तर गावठी वालाच्या शेंगा मार्केटमध्ये येण्यास एप्रिल महिना उजाडेल अशी माहिती गोपाळ वारगे यांनी दिली.