। नेरळ । प्रतिनिधी ।
घरातील एक महिला शिकलेली असेल तर त्या कुटुंबाचा उद्धार होतो आणि संपूर्ण कुटुंब शिक्षित होत असते आणि म्हणून मुलीला चांगले शिक्षण देण्याकडे भर द्यावा असे आवाहन नेरळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी केले. नेरळ येथील सुमती चिंतामणी टिपणीस वरिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहास विभाग आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या आवारात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
‘आम्ही सावित्रीच्या लेकी ती लढली आम्ही घडलो…’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक सोनी जवादे, प्रा.डॉ.नंदकुमार इंगळे प्रा.अनंत घरत, डॉ. स्नेहल देशमुख प्रा. संतोष तुरुकमाने, प्रा.अमोल सोनवणे, प्रा.सोनम गुप्ता,प्रा.दुराज टिवाळे, प्रा.विकास घारे, प्रा. वैभव बोराडे, प्रा.धनंजय कोटांगळे, आरती आवटे, नरेंद्र देशमुख यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होत्या. प्रास्तविक ग्रंथपाल जागृती घारे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील मुलींना मार्गदर्शन करताना नेरळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी स्वतः बद्दल विद्यार्थी ते पोलीस उपनिरीक्षक या त्यांच्या प्रवासा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगून प्रेरित केले. त्यांनी त्यांची स्वरचित कविता विद्यार्थ्यांना ऐकवली.त्यामुळे वर्दीमध्ये दडलेल्या कलाकाराचे दर्शन विद्यार्थ्यांना झाले. तर महिला पोलीस उपनिरीक्षक सोनी जवादे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.