नवी मुंबईवर आणखी 1608 कॅमेर्‍यांसाठी नजर

कामासाठी नऊ महिन्यांची मुदत
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
शहरात पूर्वीपासून असलेल्या 282 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत आता 1608 कॅमेर्‍यांची भर पडणार असून यात अत्याधुनिक कॅमेरे असल्याने शहरावर आता एकाच ठिकाणी बसून नजर ठेवता येणार आहे. यासाठी काम दिलेल्या ठेकेदारांकडून जागाही ठरवण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या कामाचा आढावा घेतला. यात बसवण्यात येणारे कॅमेरे हे गुन्हे व अपघात रोखण्यात उपयोगी पडतील याला प्राधान्य देण्याच्या सूचना देत गुणवत्ता राखून वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

गेली अनेक वर्षे रखडून पडलेला शहरात सीसीटीव्ही बसवण्याचा प्रकल्प मार्गी लागला असून टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लि. या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. शहरात यापूर्वी 282 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. यामुळे गुन्हे प्रकटीकरणात त्यांची मोठी मदत झालेली आहे.
आता 1608 कॅमेरे महत्त्वाचे चौक, बाजारपेठा, प्रवेशद्वारे, पामबीच मार्ग तसेच खाडीकिनारी लावण्यात येणार आहेत. ठेकेदार कंपनीकडून यासाठीच्या जागांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. याचा अहवाल महापालिका व पोलीस प्रशासनाला देण्यात आला असून पोलीस विभागाची मान्यता येणे बाकी आहे.

या पार्श्‍वभूमीवर पालिका आयुक्त यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पालिकेच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाने समन्वयाची भूमिका ठेऊन या कामाला गती द्यावी. पोलीस विभागामार्फतही सीसीटीव्ही बसवण्यासाठी काही जागा सुचविण्यात आल्या त्या जागांना प्राधान्य दयावे असे निर्देश त्यांनी दिले. ही सर्व कामे एकाच वेळी समांतरपणे सुरू करावीत. संस्थेने कामासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवावे अशाही सूचना त्यांनी दिल्या.

या कॅमेर्‍यांसाठी महापालिका मुख्यालयात विशेष काळजी केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे. त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय राखून शहरातील स्मार्ट पार्किंग, स्काडा, घनकचरा व्यवस्थापन यावर नियंत्रण टेवता येणार आहे. हे केंद्र पोलीस आयुक्तालयाशीही जोडले जाणार आहे.

वाहनाचा वेगही मोजता येणार
या कॅमेर्‍यांमध्ये काही हाय स्पीड कॅमेरे आहेत. ते पामबीचसह ठाणे बेलापूर व शीव पनवेल महामार्गावर लावण्यात येणार आहेत. अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित कॅमेरे वाहनांचे नंबरप्लेट, सिग्नल तोडणार्‍या वाहनचालकांवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच वाहनाचा वेगही मोजणार आहेत.

Exit mobile version