सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत ग्राहकांच्या माथी चॉकलेट
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथे दिवसेंदिवस सुपर मार्केट व मॉल संस्कृती वाढत जात आहे. ग्राहकही खरेदीसाठी तासन्तास दुकानाच्याबाहेर ताटकळत उभे न राहता सेल्फ सर्व्हिस असलेल्या सुपर मार्केटमध्ये जात हवी ती वस्तू घेत बाहेर पडतात. परंतु, श्रीवर्धन येथे सुपर मार्केट व मॉल मालकांनी सध्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वेगळ्या प्रकारे लूट चालवली असून, यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
श्रीवर्धन येथे मॉल व सुपर मार्केटची संख्या जवळपास सहा इतकी आहे. ग्राहकांना आपल्या सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी मालकांकडून दर महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या जातात. मोठ्या रकमेच्या खरेदीवर मिळणारी बक्षिसे व ठरावीक रकमेच्या खरेदीवर मिळणारी सूट तसेच सेल्फ सर्व्हिस या कारणाने ग्राहक सुपर मार्केटची पायरी चढतात. वातानुकूलित सुपर मार्केट व मालकांच्या अगत्याच्या दिखाऊपणाला ग्राहक बळी पडत आहेत.
सध्या सुपरमार्केट चालकांकडून खरेदीकरिता आलेल्या ग्राहकांची वेगळ्या प्रकारे लूट करण्याच्या घटना समोर येत आहेत. ग्राहकानी ऐंशी अथवा नव्वद रुपयांची खरेदी केल्यावर शंभर रुपयाची नोट काऊंटरवर ठेवल्यास सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत उर्वरित रकमेचे बिस्कीट पुडे किंवा चॉकलेट्स ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. अनेकदा ग्राहकांच्या माथी मारण्यात आलेली चॉकलेट व बिस्कीट पुडे ब्रॅन्डेड कंपनीचे नसल्याचे आढळून आले आहे.
ग्राहकांनी सुट्ट्या पैशांचा तगादा लावल्यास सुपर मार्केट चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. मस्तवाल सुपरमार्केट चालकांना कोणाचा वरदहस्त लाभलाय व यांना आवरणार कोण, तसेच सुपरमार्केट व मॉलमध्ये शासकीय अधिकार्यांची उठबस असल्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.