शस्त्रांचा धाक दाखवून लूटले

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

| मुंबई | प्रतिनिधी |

डोळ्यात मिरचीची पुड फेकून, शस्त्रांचा धाक दाखवून रोख 10 लाख रुपये लुटल्याची घटना गिरगाव परिसरात घडली. दोन संशयीत आरोपी तक्रारदार व त्याच्या सहकार्‍याचा पाठलाग करीत होते, अशी माहिती सीसी टीव्ही कॅमेर्‍यातील चित्रणाच्या तपासणीत निष्पन्न झाली. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे. ही घटना गिरगाव येथील दुसरा पांजरापोळ, गुलालवाडी सर्कलमधील श्रीनाथ सहकारी सोसायटीमध्ये घडली. इंदरकुमार मोतीलाल प्रजापती भुलेश्‍वर परिसरात राहत असून तो एका खासगी कुरियर कंपनीत कामाला आहे. हरिश प्रजापती हे त्याचे मालक असून त्यांनी शुक्रवारी त्याला दहा लाख रुपये दिले होते. ही रोख घेऊन तो गिरगावमधील श्रीनाथ सोसायटीमध्ये आला होता. यावेळी त्याच्या मागून दोन तरुण तेथे आले. या दोघांनी शस्त्रांचा धाक दाखवून इंद्रकुमार आणि त्याचा सहकारी अनुरागसिंग उमेशसिंग राजपूत यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच इंद्रकुमार आणि अनुरागसिंग जवळील रोख दहा लाख रुपये त्यांनी घेऊन पलायन केले. यावेळी दोघांनी इंद्रकुमार आणि अनुरागसिंगच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. या प्रकारामुळे दोघेही प्रचंड घाबरले. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती मालकांना दिली. मालकाच्या सूचनेनंतर त्यांनी घडलेला प्रकार व्ही. पी. रोड पोलिसांना सांगितला. याप्रकरणी इंदरकुमार प्रजापती याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेर्‍यामधील चित्रीकरण ताब्यात घेतले असून या चित्रीकरणाची पाहणी करून पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेण्यात येत आहे. आरोपी बराच काळ तक्रारदार व त्याचा सहकार्‍याचा पाठलाग करीत होते. तसेच या गुन्ह्यांमागे ओळखीच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय् व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version