। माणगाव। प्रतिनिधी ।
माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात गोरगरीब, कष्टकरी नागरिकांवर तातडीने व योग्य उपचार व्हावे, यासाठी शासनाने उभारले आहे. या उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणार्या महिला व त्याच्या नातेवाईकांकडून येथील डॉक्टर पैशाची मागणी करीत लूट करीत आहेत. याबाबत अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडून युवासेनेकडे तक्रारी आल्या असून, संबंधित डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्याकडून ते पैसे वसूल करून त्यांना परत द्यावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोमसाळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माणगाव तालुकाप्रमुख अॅड. महेंद्र मानकर, उपतालुकाप्रमुख नितीन पवार, युवासेना महाड विधानसभा अधिकारी वैभव मोरे, विभाग प्रमुख योगेश बक्कम, तालुका सचिव जितेंद्र तेटगुरे, शहरप्रमुख सुनील पवार, शाखा प्रमुख स्वप्नील उभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आरोग्यमंत्री, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, अलिबाग जिल्हा वैद्यकीय अधीक्षक, माणगाव तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकांकडून तेथील संबंधित डॉक्टर 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत मागणी करून लूट करीत असल्याचे सांगितले. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणार्या महिला, भगिनींची आर्थिक लूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा विपुल उभारे यांनी यावेळी दिला.
माणगाव उपजिल्हा रूग्णालयात येण्यार्या रुग्णांना मोफत उपचार केले जातात. तुम्ही जे लेखी निवेदन दिले आहे, ते जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांकडे पाठवून देऊन या प्रकरणाची चौकशी केली जाईल. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– डॉ. गोमसाळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, माणगाव उपजिल्हा रूग्णालय