इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांचे मत
| चेन्नई | वृत्तसंस्था |
भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कारणास्तव तो पहिल्या दोन सामन्यांतही खेळू शकला नव्हता. कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूची भारतीय संघाला उणीव भासणार यात शंकाच नाही. मात्र, त्याच्या अनुपलब्धतेमुळे भारतीय संघाचेच नाही, तर या मालिकेचे आणि जागतिक क्रिकेटचे खूप नुकसात होत आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने व्यक्त केले.
कोहलीच्या अनुपस्थितीत खेळताना भारताला हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, भारताने दमदार पुनरागमन करताना दुसर्या सामन्यात विजय मिळवत पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवला जाणार आहे.
कोहली पुढील दोन कसोटी सामन्यांतही खेळणार नाही अशी चर्चा आहे. मात्र, भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतरच नक्की काय ते कळू शकेल. तो आणखी किती सामन्यांना मुकणार हे निश्चित नाही. परंतु कोहलीसारख्या खेळाडूची अनुपलब्धता हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. कोहली खेळत नसल्याने केवळ भारतीय संघाचे नाही, तर या मालिकेचे आणि जागतिक क्रिकेटचेही मोठे नुकसान होत आहे. मात्र, त्यामुळे या मालिकेचे महत्त्व कमी झालेले नाही. या मालिकेतील पहिले दोनही सामने चुरशीचे झाले आणि उर्वरित सामन्यांतही दोन्ही संघ दर्जेदार खेळ करतील यात शंका नाही, असे हुसेन म्हणाला.