खेड शहराचे 41 कोटी रुपयांचे नुकसान

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
अतिवृष्टीत शहरातील नागरिकांच्या खासगी मालमत्तेसह नगरपालिकेचे सुमारे 41 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. काही ठिकाणचे पंचनामे आजही सुरु असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

21 आणि 22 जुलै रोजी कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरालगत वाहणार्‍या जगबुडी आणि नारिंगी नदीला पुर आल्याने खेड शहर पाण्याखाली गेले. सुमारे 48 तासांहून अधिक काळ शहराला पुराचा वेढा राहिल्याने शहरातील नागरिवस्ती, व्यापारी आणि नगरपालिकेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहराला पुराचा वेढा पडल्यानंतर नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी सुरक्षित स्थळी आसरा घेतला. मात्र पुराचे पाणी घरात, दुकानात शिरल्याने कष्टाने उभा केला संसार वाहून गेला.

पुरपुरिस्थिती ओसरल्यानंतर महसुल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले. 31 ऑगस्ट पर्यंत महसुल विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील पुरग्रस्त निवासी भागात 244 घरांचे 2 कोटी 5 लाख 30 हजार 200 रुपयांचे तर 522 आस्थापनांचे 16 कोटी 75 लाख 81 हजार रुपयांचे नुकसान झाले.नगरपालिकेच्या मालकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा आकडा 21 कोटी 67 लाख इतका आहे. या नुकसानीसह अन्य 14 ठिकाणी 54 लाख 62 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले असून हा एकंदरीत आकडा 41 कोटी 2 लाख 74 हजार 309 इतका आहे.
पुरामुळे नगरपालिका प्रशासनाचे जे नुकसान झाले आहे त्यामध्ये शहरातील मटण मच्छी मार्केटची इमारत, भाजी मार्केट इमारत, बायोगॅस प्रकल्प, शहरातील उद्याने, शहराला गुरुत्वबलाने पाणी पुरवठा करणारे बोरज धरण, तसेच शहरातील अतर्गत रस्ते यांचा समावेश आहे.

Exit mobile version