खराब रस्त्यांमुळे एसटीचे नुकसान

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे एसटी बस आधीच खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यात देखभाल दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने त्या रस्त्यात बंद पडण्याचे प्रकारही वाढले आहेत. काही दिवसांपासून श्रीवर्धन आगारातील खराब बस सेवेमुळे त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

कधी दिघीकडे जाणारी बंद पडणे तर कधी मुंबईकडे जाणार्‍या बसचे ब्रेक निकामी होण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात घडले आहेत. तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. खड्डे वाचवण्याच्या नादात अनेकदा अपघात होतात. तर काहीवेळा उतारावर बस अनियंत्रित झाल्यानेही अपघात झाल्याचे समोर आले आहेत. गेल्या आठवड्यात महामंडळाच्या तीन बसमध्ये बिघाड झाल्याची माहिती प्रवाशांकडून देण्यात आली. श्रीवर्धन-दिघी एसटी बंद पडल्याने अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

Exit mobile version