क्रीडा संचालक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

डॉ. सचिन शिंदे यांची माहिती


| म्हसळा | वार्ताहर |


महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक मिळवण्यासाठी राज्य सरकार खेळाडूंना प्रोत्साहन व अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. असे असले तरी मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांत खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा संचालक नसल्याने त्याचा फटका मुंबईसह कोकणातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे, असे स्पेडा संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, अश्वमेध क्रीडा स्पर्धा वगळता मुंबई विद्यापीठातील खेळाडू आंतर भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भरीव अशी कामगिरी करू शकले नाहीत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई विद्यापीठ सन 1857 मध्ये स्थापन झालेले असून, महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. मुंबई विद्यापीठानंतर महाराष्ट्रात इतर 18 विद्यापीठांची स्थापन झाली. मुंबई विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठांमध्ये यूजीसी रेगुलेशन 2010 व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-2016 नुसार राज्यातील बहुतांशी अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा ही पदे निर्माण करून भरलेली आहेत, तर काही महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण अधिव्याख्याता या नावानेदेखील पदे भरण्यात आली आहेत. मात्र, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित 199 अनुदानित अशासकीय महाविद्यालयांपैकी केवळ 09 महाविद्यालयांमध्ये ही पदे अस्तित्वत आहेत. उर्वरित 190 अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ती भरलेली नाहीत. परिणामी, येथील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या अनुदानित महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक हि पदे भरण्यात यावीत यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी होत आहे.

मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी राज्य शासनाला दिलेल्या पत्रात महाविद्यालयांतील खेळाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असल्याची चिंता व्यक्त केली होती तसेच शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयातील प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध नसल्याने महाविद्यालयात शिकणाऱ्या खेळाडू युवा-युवतींची अत्यंत गैरसोय होत असून, खेळाडूंची निवड करणे, संघ तयार करणे, प्रशिक्षण,मार्गदर्शन, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांसाठी खेळाडू घेऊन जाणे, क्रीडा सोयी सुविधांची निर्मिती व देखभाल, महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचे त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले होते.

महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांप्रमाणे मुंबई विद्यापीठामधील संलग्नित अशासकीय महाविद्यालयांमध्ये संचालक शारीरीक शिक्षण आणि क्रीडा हे पद त्वरित भरण्यात यावेत. यामुळे पात्रताधारकांना नोकरीची संधी उपलब्ध होईल व मुंबईसह कोकणातील लाखो खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाल्याने चांगले खेळाडू निर्माण होतील.

डॉ. सचिन शिंदे, अध्यक्ष, स्पेडा
Exit mobile version