शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

पालक आंदोलनाच्या पवित्र्यात

| रसायनी | वार्ताहर |

वासांबे मोहोपाडा हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या रीसवाडी शाळेत शिक्षकाची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याअगोदरील शिक्षक हेमराज साबळे हे बरेच दिवस शाळेत येतच नसल्याने पालकांनी गटशिक्षण अधिकारी खालापूर यांना त्यांची बदली करा अथवा नवीन शिक्षकाची नेमणूक करावी, असा अर्ज केला होता. परंतु, काही दिवसांनंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच राहिल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

यासाठी शिक्षक हेमराज साबळे यांना शासनाने सक्त सूचना करावी अन्यथा त्यांच्या जागी दुसर्‍या शिक्षकाची 31 डिसेंबरपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी पालकवर्गाने केली आहे, अन्यथा 1 जानेवारी 2024 रोजी रिसवाडी जिल्हा परिषद शाळेला टाळे ठोकून विद्यार्थ्यांना खालापूर येथे आणून गटशिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन छेडणार, असा इशारा पालकांनी दिला आहे.

शाळेत असणारे शिक्षक अनेक दिवस सुट्टीवर जात असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या शिक्षकाला गटशिक्षण विभागाने विचारणा करावी अन्यथा शाळेला दुसरा शिक्षक उपलब्ध करुन द्यावा. याबाबत पंचायत समिती खालापूर गटशिक्षण अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात.

सागर सुखदरे, सामाजिक कार्यकर्ता
Exit mobile version