शेकापमुळे सापडले हरवलेले उद्यान

कामोठे सेक्टर 5 च्या उद्यानाचे सिडको प्राधिकरणाला विस्मरण
शेकाप चिटणीस अमोल शितोळे यांची लक्षवेधी भूमिका
। पनवेल । वार्ताहर ।
शहरातील कामोठे सेक्टर 5 परिसरातील दूरवस्थेत असलेल्या उद्यानाकडे शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे चिटणीस अमोल शितोळे यांनी सिडको प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या या उद्यानाची व्यवस्था लावण्याची विनंती शेकापकडून करण्यात आली असून, प्रसंगी आंदोलनाचा इशारासुद्धा देण्यात आला आहे.
भूखंडात श्रीखंड शोधणार्‍या आणि व्यापारी दृष्टिकोन ठेवून काम करणार्‍या सिडको प्राधिकरणाकडून कामोठे वसाहतीतील सेक्टर 5 येथील उद्यानाचे विस्मरण झाले होते. अशा प्रकारचे उद्यान आपल्या नकाशावर असण्याची माहिती सिडकोच्या अधिकारीवर्गाला नव्हती. आणि यामुळेच जनसामान्यांचा कैवार राखणार्‍या शेतकरी कामगार पक्षाला सिडको प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालण्याची भूमिका घ्यावी लागली आहे.
पनवेल परिसराचे दिवसागणिक महानगरात रुपांतर होत असून, शहरातील कामोठे वसाहतीची लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पण लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध असलेल्या किंवा होत असलेल्या सुविधांची वानवा कामोठेवासी सातत्याने अनुभवत आहेत. आणि यासंदर्भातील प्रकार पुन्हा एकदा उजेडात आला आहे.
आजही या परिसरात उद्यान आणि खेळाचे क्रीडांगण विकसित करण्यात आले नाही. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी गार्डन या वसाहतींमध्ये आहेत. एक दोन ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या असल्या तरी त्याकडे सिडकोचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. सेक्टर-5 येथे उद्यानासाठी राखीव असलेला भूखंड सिडकोने विकसित केला. याठिकाणी विरंगुळा केंद्रासह, लहानसे चिल्ड्रन पार्क तसेच जॉगिंग ट्रॅक निर्माण करण्यात आले. पण निर्मितीनंतर सिडकोने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
दरम्यान, या उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथे तयार करण्यात आलेले विरंगुळा केंद्र धुळीत माखलेली आहे. आतमध्ये कचरा, प्लास्टिक पडले असून या केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना वापर करता येत नाही. या व्यतिरिक्त चिल्ड्रन पार्क ची ही दूरवस्था झाली आहे.
परिणामी सुविधा असतानाही त्याचा लाभ चिमुकल्यांना घेता येत नाही. जॉगिंग ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाला आणि पाचोळा त्याचबरोबर वाळलेली लाकडे पडलेली आहेत. या कारणामुळे नागरिकांना येथे फेरफटका मारता येत नाही. या उद्यानामध्ये शोभेच्या झाडांऐवजी जंगली झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. याकडे सिडकोचे दुर्लक्ष झाल्याने रहिवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
या उद्यानाची देखभाल आणि दुरुस्तीचे विस्मरण प्राधिकरणाला पडले. अशा प्रकारचे उद्यान आपल्याकडे आहे, याबाबत अधिकारीसुद्धा अनभिज्ञ असल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या निदर्शनास आले. यास्तव शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे चिटणीस अमोल शितोळे यांच्यासह गजानन साळुंखे, अल्पेश माने, मधुकर सूरते, शुभांगी खरात यांनी सिडको अधिकार्‍यांची भेट घेऊन दुर्लक्षित उद्यानाबाबत लक्ष वेधले.

शेकापच्या या कृतीनंतर उद्यानाबाबत अनभिज्ञ असणारे सिडको प्रशासन जागे होत, हे उद्यान शोधू लागले. काही वेळात हे उद्यान आपल्या नकाशावर असल्याचे अभियांत्रिकी विभागाच्या स्थानिक कार्यालयीन अधिकार्‍यांच्या लक्षात आले. तसेच उद्यानासंदर्भात शेकापकडून देण्यात आलेल्या निवेदनावर, लवकरात लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही सिडको प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


सेक्टर 5 मधील उद्यानात सिडकोने विरंगुळा केंद्र बांधले पण त्याचा वापर होत नाही. कारण ते सुस्थितीत नाही. यामुळे लवकरात लवकर हे उद्यान सुस्थितीत रहिवाशांसाठी खुले करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सिडकोकडे करण्यात आली आहे.
मोल शितोळे, कामोठे चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष

Exit mobile version