। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या तब्बल 75 मोबाईल फोनचा शोध घेत हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. ही उत्तम कामगिरी खारघर पोलिसांनी केली आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 11 लाख 25 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या सीईआयआर (सेंट्रल इक्युपमेंट आयडेंटीटी रजिस्टर) पोर्टलच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून या मोबाईल फोन शोधून काढत खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर पोलिसांनी हे सारे मोबाईल हस्त केले करून ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले. यापूर्वीही खारघर पोलिसांनी याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 74 गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना सुपूर्द केले होते. मोबाईल चोरी व गहाळ होण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खारघर पोलिसांनी केलेल्या या तंत्रज्ञानाधारित कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसेच सीईआयआर पोर्टलवर आवश्यक माहिती भरावी, असे आवाहन परिमंडळ 3 चे सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी केले आहे. यामुळे मोबाईल लवकरात लवकर शोधून काढण्यास मदत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. खारघर पोलिसांच्या या कामगिरीमुळे नूतन वर्षाची सुरुवातच नागरिकांसाठी दिलासादायक ठरल्याचे नागरिक सांगत आहेत.






