। चिपळूण । संतोष पिलके ।
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. लोटे येथील डीवाईन केमिकल कंपनीत रविवारी सकाळी सॉलवंट केमिकलने पेट घेतल्याने झालेल्या स्फोटामध्ये कारखान्यातील अनेक कामगार होरपळून जखमी झाले आहेत.
जखमीपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली असून तिघांना वाशी येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील डिवाईन ही कंपनी 2007 सालापासून कार्यरत असून ही कंपनी औद्योगीक रसायनचे उत्पादन करते. आज सकाळच्या पाळीतील कामगार फेब्रिकेशनचे काम करत असताना अचानक सॉलवंट केमिकलने घेतला पेट घेतला आणि ही दुर्घटना घडली. या अपघातात पहिल्या पाळीत काम करणारे सुमारे 10 ते 12 कामगार होरपळून जखमी झाले.
जखमी झालेल्या कामगाराना कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारांसाठी नेले मात्र जखमी कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने लाईफ केअर रुग्णालयाच्या व्यवस्थापने जखमी कामगारांना दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर काहीजणांना अपरान्त रुग्णालयात तर काहीजणांना चिपळूण शहरातील एस एम एस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी कामगारांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वाशी येथील बर्न हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुर्घटनेनंतर कारखान्याच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमध्ये स्फोट होऊन कामगारांचा बळी जाणे हे आता नित्याचेच झाले आहे.
गेल्या काही वर्षात अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे मात्र व्यवस्थापनाकडून काहीच धडा घेतला जात नसल्याने औद्योगीक वासाहतीत जीवघेणे स्फोट होऊन कामगारांच्या जीवावर भेटणार्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत.