विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. आजही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक झाल्याचे पाहयला मिळालं. कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली. मंत्री शंभूराज देसाई येताच विरोधकांनी ‘खोक्यांची पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे’, ‘ईडी पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे’ अशी घोषणाबाजी केली.
आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे. गारपीठग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. मविआच्या आमदारांनी, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.