उच्चदाब वीजवाहिनीमुळे जमिनींची किंमत कवडीमोल

थातूर-मातूर मोबदला देऊन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम

| नागोठणे | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 400/220 के.व्ही. या उच्च वीज दाबाचा पुरवठा करणारी विद्युत वाहिनी नागोठण्याजवळील कानसई येथील उपकेंद्रातून डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्लू स्टील कंपनीत नेण्याचे काम प्रस्तावित आहे. या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम व वीज वाहिन्या टाकण्याचे काम जेएसडब्लू कंपनीने दुसर्‍या एका खासगी कंत्राटदार कंपनीला दिले आहे. असे असतांनाच ज्या शेतकर्‍यांच्या शेतातून ही उच्चदाब वीजवाहिनी जाणार आहे, त्या शेतकर्‍यांना थातूर-मातूर मोबदला देऊन तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत. एक शेतकर्‍याला कमी भाव तर दुसर्‍याला जास्त भाव दिला जातो असे बोलले जात आहे. तसेच, शेतकर्‍यांना पटविण्यासाठी एजंट लोकांचा परिसरात सुळसुळाट सुरू झाल्याने शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आज नागोठणे परिसरात वाढलेल्या औद्योगिकरणामुळे एक-एक फूट जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. परिसरात जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असतांनाच या उच्चदाब वीज वाहिनीच्या टॉवर उभारणीच्या कामात बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना आपल्या जमिनी भविष्यात ना विकसित करता येणार वा विकता येणार, असे असतांनाच या वीजवाहिनीमुळे बाधित होणार्‍या जमिनीचा थातूर-मातूर मोबदला देण्याचे काम जेएसडब्लू कंपनीकडून टॉवर उभारणी व विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामात नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराकडून सुरू आहे. शेतकर्‍यांना कमी मोबदला रकमेत पटविण्यासाठी या ठेकेदाराने परिसरातीलच काही एजंट नियुक्त केल्याचे माहिती उपलब्ध झाली असून ‘शेतकरी कंगाल तर एजंट मालामाल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या ठेकेदाराकडून त्यांच्या जमिनीचा वापर करीत असल्याने त्या शेतक-यांना मोबदला रकमेच्या 50 टक्के रकमेचा धनादेश देऊन त्यांचे संमतीपत्र व प्रतिज्ञापत्रही घेण्यात येत आहे. तसेच, महत्वाची बाब म्हणजे ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दितून ही उच्च वीज दाबाची वाहिनी नेण्यात येत आहे त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत टॉवर उभारण्यासाठी खोदकाम करण्यात येणार असल्याने त्या त्या संबधित ग्रामपंचायतींची परवानगी घेण्याची गरज असतांना अनेक ग्रामपंचायतींची परवानगीही अद्याप घेतली नसल्याची माहितीही समोर आली आहे.


‘उच्च दाब वीज टॉवर लाईन संबधित शेतक-यांना मोबदला देण्याची जबाबदारी ही जेएसडब्लू कंपनी व संबधित ठेकेदाराची आहे. वीज वितरण कंपनीची यात कोणतीही भूमिका नाही.’

अनिल खबडे,
कार्यकारी अभियंता, वीज वितरण कं, कानसई उपकेंद्र
Exit mobile version