कोकण किनारपट्टीत कमी दाबाचा पट्टा

। मुंबई । प्रतिनिधी ।
कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्टवर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्व ठिकाणी 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Exit mobile version