गणपतराव देशमुख शेकापशी एकनिष्ठ: शरद पवार

सांगोल्यात स्मारकाचे लोकार्पण

| सांगोला | जगदीश कुलकर्णी |

अखेरच्या श्वासापर्यंत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या पश्चातही देशमुख परिवाराच्या तिसऱ्या पिढीच्या मागे सांगोल्यातील जनतेने पाठिशी राहून खंबीरपणे साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी रविवारी सांगोला (दि.13) येथे केले.


सांगोला येथे गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानिमित्ताने खा. शरद पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील, खा. रणजितसिंह मोहिते पाटील, खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आ. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, रतनबाई गणपतराव देशमुख, पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख यांच्यासह आदी नेतेमंडळी उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते पुतळा अनावरण आणि महाविद्यालयाचा नामकरण सोहळा पार पडला.

महाराष्ट्रात सांगोला हा एकमेव तालुका आहे की इथल्या मतदारांनी शेकाप आणि काँग्रेस सोडून दुसरा पक्ष स्वीकारला नाही. गणपतराव देशमुख यांनी इथल्या लोकांना एक दिशा दिली आहे. ठरलेली वाट सोडून इथली माणसं दुसऱ्या वाटेला सहसा जात नाहीत. गणपतराव देशमुख यांची तिसरी पिढी राजकारणात काही चांगले करू पाहत आहे. त्यांच्या पाठीशी लोकांनी खंबीरपणे उभे राहायला हवे.

शरद पवार, खासदार

खा. शरद पवार यांनी आपल्या भाषणातून गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. देशमुख हे 1962 साली विधानसभेत पहिल्यांदा निवडून आले. मी 1967 साली विधानसभेत निवडून आलो. देशमुख यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी होती. दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताचा ते सतत विचार करत असल्याचेही पवारांनी नमूद केले.

तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्यांना सांगोला येथे घेऊन येण्याची विनंती त्यांनी माझ्याकडे केली. मी त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांना घेऊन आलो. वाटंबरे येथे केंद्रीय मंत्र्यांनी पाहणी केली. इथल्या दुष्काळी पट्ट्यात डाळिंबाच्या बागा लागवड करण्यासाठी अर्थसाह्य करण्याची विनंती केली. तेव्हा डाळिंब बागायतीसाठी अर्थ सहाय्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय गणपतराव देशमुख यांच्यामुळे सरकारने घेतला असल्याचेही पवारांनी सांगितले. तो काळ शेकापच्या विचारांनी भारावलेला होता. माझी आई, भाऊ घरातील सर्वच लोक शेकाप विचारधारा मानणारे होते. भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांत स्पष्टता होती. भाई गणपतराव देशमुख सूतगिरणी सुरु करुन देशाला दिशा दिल्याचेही त्यांनी आवर्जून सुचित केले.

अभ्यासपूर्ण भाषणे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गणपतराव देशमुख यांच्या सोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. विधिमंडळातील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असत. प्रशासकीय कामासाठी त्यांच्याकडून अनेक नेते सल्ले घेत असत. त्यांचा अभ्यास मोठा होता, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
विधिमंडळात पुतळा बसवू
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा विधिमंडळाच्या परिसरात बसविण्याची मागणी होत आहे. आम्ही या मागणीचा निश्चित विचार करू, अशी ग्वाहीही फडणवीसांनी यावेळी दिली.

शरद पवार यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर तत्कालीन मंत्री गणपतराव देशमुख हे गाडी, बंगला सोडून एसटी बसने सांगोल्याला आले होते. विरोधी पक्षात राहून काम करण्याची शिकवण आम्हाला त्यांच्याकडून शिकता आली. त्यांचा एकलव्य म्हणून त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकता आलं.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आम्ही विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचो. गणपतराव देशमुख बोलायला उठायचे तेव्हा ते म्हणायचे, तुम्ही विदर्भाचे प्रश्न मांडता. तुमचं आणि आमचं दुखणं सारखंच आहे. एकदा राज्याच्या दुष्काळी भागात फिरा म्हणजे हे दुखणं काय आहे, ते तुम्हाला कळेल, असे सांगायाचे. असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

पुरोगामी विचारासाठी ते शेवटपर्यंत ठाम राहिले. वंचितांसाठी लढण्याचा त्यांचा बाणा कायम प्रेरणा देणारा होता. राज्याचा पाणीप्रश्न काय आहे, हे त्यांच्या भाषणातून समजायचे. त्यांच्या भाषणातून ज्ञान मिळायचे. ते विधानसभेत कायम वंचित घटकाच्या व्यथा मांडायचे. विधानसभेत एकही दिवस सुट्टी न घेणारे आमदार, विधानसभा सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत ते सभागृहात बसून असायचे. सभागृहातून बाहेर जाणारे शेवटचें आमदार आबासाहेब असायचे, अशी आठवणही फडणवीस यांनी सांगितली.

वन मॅन आर्मी
कुठलेही विधेयक चर्चेविना मंजूर होऊ नये, यासाठी भाई गणपतराव देशमुख कायम आग्रही होते. शेतकरी, वंचित घटकांबाबत त्यांच्या शब्दाला धार यायची. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार चार ते पाच असायचे. पण, गणपराव देशमुख म्हणजे 'वन मॅन आर्मी' होते. गणतराव देशमुख यांच्यासारख्यांमुळे महाराष्ट्र विधानसभेची उंची आहे; म्हणूनच देशात अशा शब्दांत फडणवीस यांनी गणपतराव देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी आ. बबनदादा शिंदे, आ. समाधान आवताडे, आ.सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार पंडितशेठ पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे नेते वैभवकाका नायकवडी, पाणी संघर्ष चळवळीचे नेते शिवाजीराव काळुंगे, पाणी संघर्ष चळवळीचे नेते बाबुराव गुरव, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी नेते उपस्थित होते.

Exit mobile version