निष्ठावंतांनी शेकापचा विचार जपला: चित्रलेखा पाटील

। पनवेल । प्रतिनिधी ।

पूर्वी प्रश्न वेगळे होते, आज प्रश्न वेगळे आहेत; पण विचार तोच आहे. विचार तो सर्वसामान्य माणसाचाच आहे. आणि, तो विचार जपण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केले आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या सोशल मीडिया सेल अध्यक्ष तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षात तरुण पिढीला काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सरचिटणीस मा. आमदार जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाची तरुण पिढी, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला, या सर्वसामान्यांचा लढा, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा आवाज हा खऱ्या अर्थाने वरपर्यंत घेऊन जातील, सगळ्यांना न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला.

आमच्यावर अनेकदा आरोप केला जातो की, आम्ही विरोधाला विरोध करतो. खोटं पसरवण्याचे प्रयत्न करतात. परंतु, मी सर्वांना सांगू इच्छिते की, विरोधक खोटा प्रचार समाजमाध्यमांतून करीत आहेत. आम्ही विरोध नाही करीत, तर सर्वसामान्यांना न्याय देण्याचाच प्रयत्न करतो, असेही चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

आज जनसुरक्षा कायदा सरकारने आणला आहे. याचे फार मोठे गंभीर परिणाम राज्यातील जनतेला भोगावे लागणार आहेत. कारण, या कायद्यामुळे सामान्यांचा आंदोलनाचा हक्कच सरकारने हिरावून घेतला आहे. जेव्हा सर्वसामान्य माणसावर अन्याय होतो, अत्याचार होतो, मग त्यांनी रस्त्यावर यायचं नाही का? आज सरकारचे आपला आवाज दाबण्याचे जे धोरण आहे, त्याला खऱ्या अर्थाने हाणून पाडायचे असेल, तर लाल बावटा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याला आक्रमक होऊन लढायला लागेल. आणि, हाच संकल्प या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करुया, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीचे मावळे आहोत. आपण संभाजी महाराजांचे छावे आहोत. कभी झुकेंगे नहीं. एवढेच लक्षात ठेवा; फक्त नि फक्त आगे बढेंगे, असाही शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला.

Exit mobile version