। मुंबई । प्रतिनिधी ।
गोरेगावमधील राजाराम चाळीत बुधवारी (दि.10) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात तीन जण होरपळले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून दुर्घटनाग्रस्त घरासह शेजारच्या घराची भिंत कोसळली.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीतील खोली क्रमांक 180 मध्ये सकाळच्या सुमारास जेवणाची लगबग सुरू होती. दरम्यान, स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून वायूची गळती होऊ लागल्याचे घरातील व्यक्तींच्या लक्षात आले नाही. मात्र, काही मिनिटातच स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराची भिंत क्षणार्धात कोसळली. त्यांनतर आसपासच्या नागरिकांनी तात्काळ मदतकार्य हाती घेतले आणि मोठ्या प्रयत्नांनंतर साडे आठ वाजण्याच्या सुमारास आग विझविली. दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत करण्यात आला. या दुर्घटनेत मालती देवी (28), सरजन अली जावेद शेख (37), गुल मोहम्मद अमीन शेख (38) आदी होरपळले. मालती देवी यांना नजीकच्या एचबीटी ट्रॉमा केअर रुग्णालयात, तर सरजन अली जावेद शेख आणि गुल मोहम्मद अमीन शेख यांना बोरिवलीतील गणेश रुग्णालयात दाखल करण्यात आले. मालती देवी यांना पुढील उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, दुर्घटनाग्रस्त घरासह शेजारच्या घराची भिंत कोसळली.







