गुणतालिकेत दुसर्या स्थानी झेप
| मोहाली | वृत्तसंस्था |
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर 56 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सवर मात केली. लखनौ संघानं पंजाबला 258 धावांचं भलं मोठं लक्ष्य दिलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 19.5 षटकांत 201 धावांवर गारद झाला. या विजयासोबतच लखनौने गुणतालिकेत गुजरातला मागे टाकत गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
दरम्यान, काईल मेयर्स (54 धावा), आयुष बदोनी (43 धावा), मार्कस स्टॉयनिस (72 धावा) व निकोलस पुरन (45 धावा) यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीएलच्या इतिहासातील 257 ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या उभारली. पंजाबच्या अथर्व तायडेने अर्धशतक झळकवून आयपीएलमध्ये अर्धशतक झळकविणारा विदर्भाचा पहिला फलंदाज हा मान मिळविला.
लखनौकडून मिळालेल्या 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्या पंजाबची सुरुवात अपेक्षेप्रमाणे निराशाजनक झाली. 31 धावांमध्ये पंजाबने दोन विकेट गमावले. कर्णधार शिखर धवन (1 धाव) व प्रभसिमरन सिंग (9 धावा) हे बाद झाले. त्यानंतर अथर्व तायडे (66 धावा) व सिकंदर रझा (36 धावा) या जोडीने थोडीफार झुंज दिली. रवी बिश्नोईने अथर्वला, तर यश ठाकूरने रझाला बाद केले. बिश्नोईनेच लियाम लिव्हिंगस्टोनला 23 धावांवर बाद केले. पंजाबचा डाव 201 धावांमध्येच आटोपला.
यश ठाकूर याने 37 धावा देत 4 फलंदाज बाद केले. दरम्यान, याआधी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लखनौचा सलामीवीर काईल मेयर्सने नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजीला सुरुवात केली.
विक्रमी धावसंख्या
लखनौने 5 बाद 257 धावा उभारत आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या उभारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने 2013 मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्धच्या लढतीत 5 बाद 263 धावा फटकावल्या होत्या. आतापर्यंत बंगळूर संघाने उभारलेला विक्रम अबाधित आहे. त्या लढतीत ख्रिस गेलने नाबाद 175 धावांची खेळी केली होती. बंगळूरने ही लढत 130 धावांनी जिंकली हे विशेष.