ल्यूक मडग्वेची पहिल्या टप्प्यात बाजी

| पुणे | प्रतिनिधी |

सायकल स्पर्धेच्या पहिला टप्प्याचा मार्ग पिंपरी-चिंचवड, मावळ आणि मुळशीतून होता. गवताळ प्रदेश, वळणदार डोंगराळ रस्ते आणि धरणाचे विलोभनीय बॅकवॉटर अशा निसर्गरम्य, परंतु खडतर अशा मार्गावर सायकलपटूंचा कस लागला. 87.2 किलो मीटरच्या आव्हानात्मक मार्गावर मंगळवारी चीनच्या ली निंग स्टार संघाचा ल्यूक मडग्वे विजेता ठरला.

त्याने दोन तास 21 सेकंदांत 87.2 किलोमीटरचे अंतर पार करून बाजी मारली. बजाज पुणे ग्रँड टूरला हिंजवडीमधील टीसीएस सर्कल येथून उत्साहात सुरुवात झाली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पहिल्या टप्प्यात ल्यूकला विजयासाठी मोठी झुंज द्यावी लागली. एस्टोनियाच्या क्विक प्रो संघाचा अँड्रियास मटिल्डास दोन तास 27 सेकंदांसह दुसरे स्थान मिळाले, तर बेल्जियमच्या टार्टलेटो-आयसोरेक्स संघाचा योर्बेन लॉरिसेन (दोन तास 30 सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिला.

युनियन सायकलिंग इंटरनॅशनलच्या नियमांनुसार, पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे दहा, सहा आणि चार सेकंदांचा टाइम बोनस देण्यात आला. जो पुढील टप्प्यांमध्ये निर्णायक ठरू शकतो. अपघातामुळे काही काळ शर्यत थांबली सायकलपटूंच्या पथकाला कोळवण परिसरात किरकोळ अपघात झाला. काही सायकलस्वारांची धडक होऊन ते रस्त्यावर कोसळले. त्यात तीन सायकलपटू किरकोळ जखमी झाले.

सुरक्षा कारणास्तव शर्यत सुमारे 23 मिनिटे थांबविण्यात आली होती. वैद्यकीय तपासणी आणि तांत्रिक कामांनंतर शर्यत पुन्हा सुरक्षितपणे सुरू करण्यात आली. अपघात झालेल्या तीन सायकलपटूंपैकी मलेशिया राष्ट्रीय संघाचा एक सायकलपटू शर्यत पूर्ण करू शकला नाही, तर उर्वरित दोन्ही खेळाडूंनी शर्यत पूर्ण केल्याचे ‘यूसीआय’च्या कमिशनर पॅनेलचे अध्यक्ष एडवर्ड पार्क यांनी सांगितले. तसेच, अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version