कर्जतमध्ये लम्पीचा वाढता धोका
सात जनावरे बाधित, लसीकरण वेगाने सुरु
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात लम्पीबाधित गोवंशीय पशुंची वाढ झाली आहे. तालुक्यात कोल्हारे गावातील पशु लम्पीबाधित झाला असून तालुक्यात सात ठिकाणी पशूंना हा आजार जडला आहे. दरम्यान तालुक्यात पशुवैद्यकीय विभागाने सात ठिकाणी फवारणी केली आहे.
तालुक्यात बाहेरून आणलेले गोवंशीय जनावरे यांना लम्पीसदृश आजाराने गाठले असून त्यात पिंपळोली गावातील एका पशुचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यात लम्पीसदृश जनावरे खांडस, वावे, आंबिवली, कळंब, मिरचूल वाडी, अवसरे, पिंपळोली येथे हि जनावरे आढळून आल्यानंतर पशु वैद्यकीय विभागाने तालुक्यात या सहा ठिकाणी सरसकट सर्व गोवंशीय जनावरे यांचे लसीकरण करण्यात आले आहे. कर्जत तालुका लम्पीबाधित तालुका जाहीर केला आहे. त्यामुळे या ठिकाणी मुंबई येथून पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक तालुक्यात आले आहे.
जिल्ह्यातील पशुधन अधिकारी यांचे लक्ष असताना आणि लसीकरण वेगाने सुरु असताना पशु लम्पिने बाधित झाला आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. थोरात, डॉ. बागुल यांनी भेट देऊन पाहणी करून उपचार सुरु केले आहेत. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी असलेले 40 गोवंशीय यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून तेथे कोणत्याही गोवंशीयाला बांधीत केले नसल्याने पशु वैद्यकीय विभागाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
तालुक्यात लम्पीचा धोका लक्षात घेऊन तालुक्यातील 17 पशु वैद्यकीय रुग्णालये येथील पशुवैद्याकीय अधिकार्यांना लसीकरणसाठी गावोगावी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 90 टक्के गोवंशीय जनावरे आणि म्हैस वर्गातील जनावरे यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत.
डॉ मिलिंद कदम, तालुका पशु वैद्यकीय अधिकारी
लम्पिच्या भीतीने गुरांचे नमुने तपासनीला
| पनवेल । वार्ताहर ।
राज्यभरात लम्पि आजाराचा प्रदुर्भाव वाढत आहे. पनवेल तालुक्यात अद्यापही लम्पि आजाराने त्रस्त पशु आढळून आलेले नाहीत, असे असले तरी प्रशासनाच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी पाळली जात असून तालुक्यातील काही गावात गुरांमध्ये लम्पीसदृश आजाराची लक्षणे आढळल्याने या गुरांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
तालुक्यातील गुरांमध्ये लम्पि आजाराचा फैलाव होऊ नये या करता पशु वैद्यकीय विभाग विशेष खबरदारी घेत आहे. तहसीलदार विजय तळेकर यांनी या बाबतचा आढावा घेतला आहे. तालुक्यातील पाले खुर्द आणि वावंजे या दोन गावांतील गुरांमध्ये लम्पीसदृश लक्षणे आढळले आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लम्पी हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असल्याने पशुपालकांनी गुरांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
तालुक्यात जवळपास 13,226 जनावरे आहेत. त्यापैकी 4,572 गोवंशीय व 5,660 म्हैसवर्गीय आहेत. तालुका प्रशासनाने गावागावांत सर्वेक्षण सुरू केले आहे. महापालिका क्षेत्रात 175 गोठे असून आठशे जनावरे आहेत. म्हशींची संख्या याठिकाणी जास्त असून लम्पी प्रतिबंधासाठी गोठ्यांमध्ये फवारणी करण्यात आली आहे. तसेच गोशाळेमध्ये सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वावंजे आणि पाले खुर्द या गावांमध्ये लम्पीसदृश स्थिती निर्माण झाल्याने जनावरांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.