आलिशान एसी सलून कोच बंद

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील टॉय ट्रेनला पर्यटकांची विशेष पसंती असते. लाखो प्रवासी या ट्रेनची सफर करत निसर्गाचा आनंद लुटतात. हीच बाब लक्षात घेत मध्य रेल्वेने मिनी टॉय ट्रेनला विशेष एसी सलून कोच जोडण्याचा निर्णय फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी घेतला. आठ आसनी विशेष डबा नेरळ ते माथेरान आणि त्याच दिवशी परतीच्या प्रवासासाठी आणि रात्रीच्या मुक्कामासाठी बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आला होता. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून एकही बुकिंग या कोचसाठी आली नसून पावसाळ्याच्या चार महिन्यांत नेरळ-माथेरान मार्ग बंद असल्याने हा लाखो रुपये खर्च करून बनवलेला सलून कोच मध्य रेल्वेला बंद ठेवावा लागत आहे.

पावसाळ्याच्या जून ते सप्टेंबर या कालावधीत नेरळ-माथेरान हा मार्ग खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात येतो. परिणामी रेल्वे मार्गे प्रवास न करता इतर सार्वजनिक अथवा खासगी वाहनांनी येथे येतात परंतु अव्वाच्या सव्वा असलेले सलून कोचचे भाडे आणि ऑनलाईन बुकिंग सुविधा नसल्याने पर्यटकांनी या कोचकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे. या सलून कोचचे दर, सोमवार ते शुक्रवार कालावधीत 32,088 रुपये, तर आठवड्या अखेरीस शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी 44,608 रुपये इतके आकारण्यात आले होते .माथेरानच्या एका दिवसाच्या मुक्कामाकरता येथे खिशाला कात्री लावण्यासारखे असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. या कोचसाठी आकारण्यात आलेले दर सर्वाधिक असून येणारे सर्वसामान्य प्रवासी पर्यटकांसाठी न परवडणारे आहे. त्यामुळे याचा दर कमी करण्याबाबत पुन्हा विचार करावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version