जेएसडब्यूच्या 16 खलाशांची सुखरुप सुटका; हेलिकॉप्टरच्या मदतीने तटरक्षक जवानांनी केले रेस्क्यू ऑपरेशन
16 तासांचे सुटकाचक्र; चेतक हेलिकॉप्टरने वाचवले 16 जणांचे प्राण
। अलिबाग । भारत रांजणकर ।
विशाखापट्टणम येथील वायझॅक बंदरातून साळव येथील जेएसडब्ल्यू कंपनीत लोखंडाचा कच्चा माल घेऊन येणारी बार्ज गुरुवारी 17 मे रोजी रेवदंडा बंदरात बुडाली. भरतीचे पाणी बार्जमध्ये घुसल्याने हा अपघात झाला. या बार्जमध्ये 16 खलाशी अडकून पडले होते. यापैकी 13 खलाशांना तटरक्षक दलाच्या जवानांनी चेतक या दोन हेलिकॉप्टरच्या साहाय्याने, तर तीन जणांना बोटीच्या साहाय्याने वाचवण्यात आले. हे रेस्क्यू ऑपरेशन सुमारे तीन तास सुरू होते. तटरक्षक दल, पोलीस, महाराष्ट्र मेरिटाईम विभाग, महसूल यांनी हे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले. एम.व्ही. मंगलम, असे या बार्जचे नाव आहे.
साळव येथे स्टील उत्पादक कंपनी आहे. विशाखापट्टणम येथून बार्जच्या साहाय्याने कच्चा माल समुद्रमार्गे कंपनीतील जेट्टीवर आणला जातो. विशाखापट्टणम येथील वायझॅक बंदरातून दहा ते पंधरा दिवसांपूर्वी एम.व्ही.मंगलम ही बार्ज साळव जेएसडब्ल्यू कंपनीत लोखंडी कच्चा माल घेऊन निघाली होती. या बार्जमध्ये 16 खलाशी प्रवास करत होते. 16 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रेवदंडा बंदरातील कोर्लई परिसरातील समुद्रात भरतीच्या उसळलेल्या लाटेमुळे नेहमीच्या मार्गावरून बार्ज बाजूला गेली.त्यामुळे बार्जच्या कॅप्टनने पुन्हा तीला नेहमीच्या मार्गावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला.
त्यामुळे बार्ज आहे, त्याठिकाणीच थांबविण्यात आली. ही बार्ज भर समुद्रात अडकल्यामुळे खलाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर कॅप्टनने तटरक्षक दल आणि कंपनीच्या संबंधित अधिकार्यांना मदतीसाठी संपर्क केला. रेवदंडा समुद्रात बार्ज बुडल्याची माहिती कळताच तटरक्षक दल, पोलीस, मेरिटाईम विभाग घटनास्थळी त्वरित दाखल झाले. तटरक्षक दलाने माहिती मिळताच दिघीमार्गे बोटीने पहिले पथक घटनास्थळी पाठविले.
या दलाने बार्जमधील तीन जणांना बोटीच्या साहाय्याने समुद्रकिनारी सुखरूप आणले. त्यानंतर आलेल्या तटरक्षक दलाच्या दोन चेतक हेलिकॉप्टरच्या साहाय्याने भर समुद्रात भरतीच्या वेळी रेस्क्यू ऑपरेशन करून 13 खलाशांना सुखरूप रेवदंडा किनार्यावर आणले. तीन तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. त्यानंतर खलाशांना वैद्यकीय उपचारासाठी रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी तटरक्षक दलाचे कॅप्टन अरूण कुमार सिंग, कर्मचारी, प्रादेशिक बंदरचे कॅप्टन चोकेश्वर लेपांडे, बंदर अधिक्षक, अलिबाग अरविंद सोनावणे, रेवदंडा बंदर निरिक्षक अमर पालवणकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम ,रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक थोरात, पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी होते.
तब्बल 17 तास पडले होते बार्जवर अडकून अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव येथील समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीच्या बार्जला अपघात झाला. रायगड पोलिस, तटरक्षक दलाने रेस्क्यू ऑपरेशन करत 16 खलाशांचे प्राण वाचवले आहेत, अशी माहिती रायगडचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली.जेएसडब्ल्यू कंपनीची एम.व्ही.मंगलम बार्ज सुमारे दोन हजार 400 मेट्रिकटन आर्यन हा कच्चा माल घेऊन मुंबईहून बार्ज निघाली होती. बार्जवर 16 खलाशी होते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असताना बार्ज समुद्रातील गाळात रुतून बसली. याबाबतची कोणतीच माहिती यंत्रणेला संबंधीत कंपनीने दिली नाही. आहोटी सुरु झाल्याने बार्ज गाळात रुतली. काही कालावधीने भरती सुरु होईल आणि बार्ज पुन्हा कंपनीकडे येईल, असे व्यवस्थापनाला वाटले असावे परंतू सुमारे आठ-दहा तासांनी बार्ज खालून लिक झाली. बार्जमध्ये हळूहळू पाणी शिरु लागल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. सकाळी याबाबत रायगड पोलिसांना माहिती मिळताच. भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता बचाव कार्य हाती घेण्यात आले, असे गुंजाळ यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी साडे दहा असे तब्बल 17 तास खलाशी बार्जवरच अडकून पडले होते. बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे दोन हेलीकॉप्टर, बोटी बचाव कार्यात पुढे होत्या. बार्जवरील 13 खलाशांना हेलीकॉप्टरच्या, तर तीन खलाशांना बोटीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व खलाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. सर्व खलाशी सुखरुप आहेत,असेही गुंजाळ यांनी स्पष्ट केले.
16 खलाशांचा जीव धोक्यात घातला
दरम्यान, आपत्तीच्या कालावधीत कंपनीने यंत्रणेला माहिती दिली नाही. त्यामुळे 16 खलाशांच्या जीव धोक्यात घालण्यात आला. कंपनीच्या या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत संबंधीत कंपनी व्यवस्थापनावर कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे .बार्ज मधील कप्टन सुदाम देबनाथ, अधिकारी सिररा राजू, कनिष्ट अधिकारी मन्ताव्याराज, इंजि. संतोष कुमार अत्तरी, इंजि. मुसैर रेहमान, इंजि. मयांक तांडेल, तसेच कर्मचारी अमित निषाद, एम.डी.सर्फराज, पवनकुमार गुप्ता, मोहम्मद कैफ, समीर विश्वकर्मा, राकेश कुमार गुप्ता, संपत मोहम्मद, मनोज कुमार जैसवाल,पंकज कुमार पटेल, एस.के. मौन आदी जण सुखरूप समुद्र किनारी पोहचले. बार्ज मधील सर्व सुखरूप पोहचलेल्या कामगारानी उपस्थित अधिकारी वर्गाचे विशेष आभार व्यक्त केले.
बुडालेल्या बार्जमधील खलाशांच्या बॅगा किनार्यावर
बुडालेल्या मंगलम बार्जमधील खलाशांच्या बॅगा समुद्रकिनारी वाहत आल्या. सदर बॅगा रेवदंडा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. या बॅगांमध्ये खलाशांचे कागदपत्रं, पासपोर्ट, पैसे, मोबाईल अशा चिजवस्तू आहेत. या बॅगा स्थानिकांना समुद्रकिनारी सापडल्या. त्यांनी त्याबबत पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी स्थानिकांकडून सदर बॅगा ताब्यात घेतल्या आहेत.