खाडीतील मासेमारीवर असणार मदार

। रायगड । प्रतिनिधी ।

अनेक अडचणींवर मात करीत यंदाच्या मासळी हंगामाचे सूप वाजले आणि पावसाळी बंदीमुळे मच्छीमारी नौका पाण्याबाहेर काढल्याने बंदर सुने सुने झाले. मासळीची उलाढाल मंदावल्याने पुढील काही महिने स्थानिक पातळीवर आर्थिक गणिते थंडच राहतील. सध्या खाडीतील मासेमारी सुरू असली तरी त्यातून अपेक्षित मासळी मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. मासळी अभावी पुरक व्यवसायही मंदावले आहेत. निसर्गाची अपेक्षित साथ लाभली तर हंगाम चांगला जाण्यास मदत होते. मे अखेरपर्यंत मत्स्य व्यवसाय संपुष्टात येतो आणि स्थानिक पातळीवर सर्वच बाबतीत आर्थिक शिथिलता येते.

यंदा मासळी हंगामाची सुरूवात दमदार झाली होती. त्यानंतर कोळंबी मासळी मिळाल्याने हंगामाचा शेवटही चांगला झाला. मात्र, हंगामाच्या मध्यावधीचा कालावधी तितकासा समाधानकारक झाला नाही. त्यामुळे यंदाच्या मासळी हंगामात चढउतार राहिले. मध्यंतरी मासळीचे प्रमाण घटल्याने मत्स्य व्यवसायिकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. मच्छिमारांचा दैनंदिन खर्च आणि मासळी मिळण्याचे प्रमाण व्यस्तच राहिले. तसेच उपलब्ध मासळीला अपेक्षित दर नसल्याने खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालणे अवघड बनले. डिझेल, बर्फ, वाहतूक, मच्छीमार दैनंदिन खर्च तसेच राहिले आणि मासळीचे प्रमाण मात्र कमी राहिल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. शासनाच्या निकषांप्रमाणे 1 जुन ते 31 जुलै असा मासेमारी बंदी कालावधी असल्याने 31 मे रोजी हंगामाचा शेवट झाला. एक ऑगस्टपासून नव्या हंगामाची सुरूवात होणार असली तरी पाऊस आणि समुद्राची संभाव्य वादळी स्थिती लक्षात घेता मच्छिमार तातडीने मासेमारी हंगामाला प्रारंभ करताना दिसत नाही.

सर्वसाधारणपणे मच्छिमार नारळीपौर्णिमेला नौकांची विधिवत पूजा करून नव्या हंगामासाठी सज्ज होतात. मात्र, खर्‍याअर्थाने गणेश विसर्जनानंतरच नव्या हंगामाची चाहूल लागते. त्यामुळे 61 दिवसांचा मच्छिमारी बंदी कालावधी असला तरीही हंगाम सुरू होईपर्यंत सुमारे तीन महिने होतात. त्यामुळे या काळात सर्वच बाबतीत थंड प्रतिसाद असतो. काहीजण पावसानंतर तातडीने मासेमारीला जातात. त्यावेळी बर्‍यापैकी मासळी मिळते, असा अनुभव असल्याने हंगामाच्या सुरूवातीची मासळी कॅच करण्यासाठी मच्छिमारांची धडपड असते. सध्या मच्छिमारी ट्रॉलर पाण्याबाहेर काढण्यात आल्याने बंदर सुनेसुने झाले आहे. मासळी लिलावाच्या ठिकाणी शुकशुकाट पसरलेला असतो. पाण्याबाहेर काढलेल्या नौकांची डागडुजी सुरू आहे. नौकांची पावसाळी कामे केली जात आहेत. नव्या हंगामासाठी नौका सज्ज केल्या जात आहेत. यंदाच्या हंगामाची साधकबाधक चर्चा करीत मच्छिमार नव्या हंगामाच्या आशा उराशी बाळगून आहेत.

आर्थिक उलाढालीची स्थिती बदलली
पूर्वी डिजिटल जमान्याआधी मे महिन्यातील मासळीची रक्कम पुढे जुन-जुलै महिन्यापर्यंत यायची. त्यामुळे पावसाळ्यातही बर्‍यापैकी चलती असे. मात्र, सद्यस्थितीत डिजीटल आणि सोशल मिडियामुळे उलाढालीचे चित्र रोजच्या रोज समजत असल्याने आर्थिक उलाढालीची स्थिती ज्यात्यावेळीच स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे.
तर यांनाही बसतो फटका
मासळी हंगाम संपुष्टात आल्याने तसेच मध्यंतरी मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम पुरक व्यवसायावर होताना दिसतो. वाहतुक व्यवस्थेसह अन्य पुरक व्यवसायांना त्याची आर्थिक झळ सोसावी लागते. मासळी लिलावाच्या ठिकाणी मासळीची उलाढाल चांगली राहिल्यास छोट्या व्यवसायिकांनाही त्याचा लाभ होतो. त्यामुळे मासळीशी निगडित अन्य मंडळीनाही हंगामातील चढउताराची तीव्रता सहन करावी लागते.
Exit mobile version